कुलू-मनालीत पॅराग्लायडिंग करताना साताऱ्यातील सुरज शहाचा मृत्यू

कुलू-मनालीत पॅराग्लायडिंग करताना साताऱ्यातील सुरज शहाचा मृत्यू

कुलू : हिमाचल प्रदेशमधील कुलू-मनाली येथे पॅराग्लायडिंग दरम्यान पॅराशूटचा बेल्ट निसटून झालेल्या अपघातामुळं साताऱ्यातील तरुणाचा मृत्यू झालाय. अपघातात मृत्यूमुखी पडलेला तरुण सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथील आहे. सुरज शहा असं मृत तरुणाचं नाव आहे. तो 30 वर्षांचा होता. या घटनेमुळं शिरवळ शहरावर शोककळा पसरलीय. सुरजच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

सुरज आपल्या मित्रांसह नाताळाची सुट्टी साजरी करण्यासाठी हिमाचल प्रदेशमध्ये गेला होता. सुरजचे वडील उद्योजक आहेत. सुरज मित्रांबरोबर तो ख्रिसमस आणि न्यू इयर सेलिब्रेशनसाठी कुलू-मनालीला गेला होता. सुरज साधारणपणे 800 फुटावरून खाली पडल्याचं सांगण्यात येतंय.

कुलू-मनाली येथील प्रेक्षणीय स्थळांबरोबरचं पॅराग्लायडिंग हे पर्यटकांसाठी विशेष आकर्षण असते. अनेक पर्यटक खासकरुन पॅराग्लायडिंगसाठी मनालीत जातात. पॅराग्लायडिंगसाठी सुरक्षेच्यादृष्टीनं काही गोष्टींची काळजी घ्यायची असते, मात्र सुरजचा सेफ्टी बेल्ट निसटल्यानं अपघाती मृत्यू झालाय, त्यावरुन अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, कुलूमधील पॅराग्लायडिंग साईट डोभी येथे हा अपघात झाला. डोभी येथील पॅराग्लायडिंग साईटवरून पायलटने उड्डाण घेतले. थोड्याच वेळानंतर अपघात झाला. उंचावरुन कोसळलेल्या सुरजचा मृतदेह सफरचंदाच्या शेतात आढळला. पायलटदेखील जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube