उद्धव ठाकरेंना लोक सोडून गेले, राज ठाकरेंच काय ? ते १३ आमदार कुठे आहेत?

  • Written By: Published:
उद्धव ठाकरेंना लोक सोडून गेले, राज ठाकरेंच काय ? ते १३ आमदार कुठे आहेत?

राज ठाकरे यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश मिळवलं. पण पहिल्या विधानसभा निवडूणुकीत जिंकून आलेले राज ठाकरे यांचे ते १३ आमदार कुठे आहेत?

राज ठाकरे हे नाव महाराष्ट्राच्या राजकारणाला नवं नाही, आपल्या आक्रमक भाषणशैलीच्या जोरावर त्यांनी शिवसनेतेतून बाहेर पडून नव्या पक्षाची स्थापना केली आणि पहिल्याच प्रयत्नात विधानसभेत यश मिळवलं. पण २००९ च्या पहिल्या विधानसभा निवडूणुकीत जिंकून आलेले राज ठाकरे यांचे ते १३ आमदार कुठे आहेत? हा प्रश्न विचारला जातो, त्याच उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न?

गुडीपाडवा मेळावा आणि ठाकरे 

काल राज ठाकरे यांनी मनसेचा दरवर्षीप्रमाणेच गुडीपाडवा मेळावा आयोजित केला होता. आपल्या भाषणात त्यांनी सर्वच पक्षांना लक्ष्य केलं पण यावेळी त्यांच्या निशाण्यावर उद्धव ठाकरेही होते. उद्धव ठाकरेंना धनुष्य पेलवलं नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांना शिवसेना चालवता आली नाही. अशी टीका त्यांनी केली.

राज ठाकरेंनी उद्धव त्यांच्यावर टीका केली पण त्याच वेळी सोशल मीडियावर एक प्रश्न उपस्थित केला गेला. राज ठाकरेंना तरी कुठे पक्ष चालवता आला किंवा लोक सांभाळता आले. कारण पहिल्याच निवडणुकीत १३ आमदार जिंकून आणणाऱ्या राज ठाकरे यांना परत तेवढे आमदार आणता आले नाहीत आणि ते १३ आमदारही सोबत ठेवता आले नाहीत. निवडून आलेल्या त्या १३ पैकी बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई हे दोनच नेते त्यांच्या सोबत दिसतात.

Raj Thackeray : गुढीपाडवा मेळाव्याच्या भाषणानंतर राज ठाकरे विरोधात पुण्यात पोलिसात तक्रार

१. बाळा नांदगावकर

२००९ च्या निवडणुकीत निवडून आलेल्या १३ पैकी अनेक नेते सोडून गेले तरी काही नेते मात्र आजही राज ठाकरेंच्या सोबत आहेत. यापैकी सर्वात महत्वाचं नाव म्हणजे बाळा नांदगावकर.  राज ठाकरेंसोबतच ते शिवसेनेतून बाहेर पडले होते. २००९ साली ते मुंबईतील शिवडी मतदारसंघातून ते मनसेचे आमदार झाले. २०१४ मध्ये मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. २०१९ मध्ये त्यांनी निवडणूक लढली नाही. पण ते आजही राज ठाकरेंसोबत आहेत आणि ते राज ठाकरेंचे सर्वाधिक विश्वासू मानले जातात.

२. नितीन सरदेसाई

बाळा नांदगावकर यांच्याप्रमाणेच नितीन सरदेसाईही राज ठाकरेंचे निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. २००९ मधून ते मुंबईतील माहीममधून मनसेचे आमदार झाले. मात्र २०१४ ला पराभूत झाले. पण ते आजही पक्षात आहेत आणि मनसेचे सरचिटणीस म्हणून ते काम करत आहेत. 

३. प्रवीण दरेकर

आज महाराष्ट्र भाजपचे मोठे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे प्रवीण दरेकर मनसेच्या पहिल्या टप्प्यात मनसेचे आमदार होते. २००९ साली ते मनसेच्या तिकिटावर मागाठाणे मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. २०१४ मध्येही ते मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढले. मात्र त्यांचा पराभव झाला. नंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला. नंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवर पाठवले. सध्या ते भाजपत आहेत.

‘धन्य ते हास्यसम्राट’.. राज ठाकरेंच्या पाडवा मेळाव्यावर राष्ट्रवादीचा खोचक टोला

४. राम कदम

आज भाजपचा टीव्हीवरचा चेहरा म्हणून दिसणारे राम कदम एकेकाळी मनसेचा आक्रमक चेहरा होते. राम कदम यांनी २००९ साली मनसेच्या तिकिटावर घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवत भाजपच्या पूनम महाजन यांचा पराभव केला होता. नंतर २०१४ साली मात्र ते भाजपमध्ये गेले. २०१४ आणि २०१९ दोन्ही वेळी ते भाजपचे आमदार आहेत.

५. हर्षवर्धन जाधव

गेल्या काही वर्षात हर्षवर्धन जाधव अनेक वादग्रस्त विधानामुळे चर्चेत येतात. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई असलेले हर्षवर्धन जाधव मनसेचे आमदार होते. २००९ साली कन्नड मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडून आले होते.पुढे त्यांनी मनसेची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. २०१४ साली शिवसेनेच्या तिकिटावर आमदार झाले. पण २०१९ साली औरंगाबाद लोकसभेची निवडणूक लढवली आणि पराभव स्वीकारला. दरम्यान आपल्या नव्या पक्षाची स्थापना करून पुन्हा एकदा मनसेत प्रवेश केला. मध्यंतरी त्यांनी राजकीय निवृत्तीचीही घोषणा केली. 

६.  उत्तमराव ढिकळे

नाशिकच्या राजकारणात मोठं नाव असलेल्या उत्तमराव ढिकळेंनी २००९ च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या तिकिटावर नाशिक पूर्व मतदारसंघातून विजय मिळवला. त्यांनी भाजपच्या बाळासाहेब सानप यांना पराभूत केले होते. २०१५ मध्ये ढिकळे यांचे निधन झाले. त्यांचे पुत्र राहुल ढिकळे सध्या याच मतदारसंघातून भाजपचे आमदार आहेत.

७. वसंत गिते

एकेकाळी शिवसेनेत असलेले वसंत गिते हे राज ठाकरेंच्या पाठोपाठ मनसेत आले होते. २००९साली नाशिक मध्य मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवत आमदार झाले. पण पुढे २०१४ च्या निवडणुकीत त्यांना भाजपच्या देवयानी फरांदे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. पुढे २०२१ मध्ये गिते यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.

राज ठाकरेंच्या सभेत नेत्यांचा लवाजमा अमित ठाकरे मात्र…

८. नितीन भोसले

एकेकाळी मुंबई पाठोपाठ मनसेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिक मधील नितीन भोसलेंनी २००९ साली नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर विजय मिळवला. पण त्यानंतर २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांना सलग पराभवाचा सामना करावा लागला. तरीही नितीन भोसले सध्या मनसेतच आहेत.

९. रमेश पाटील

एकेकाळी काँग्रेसमध्ये असलेल्या रमेश पाटील यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवत विजय मिळवला होता. २००९ साली मनसेचे आमदार असलेल्या पाटील यांनी २०१४ साली पुन्हा मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते पुन्हा परत काँग्रेसमध्ये गेले. पण रमेश पाटील यांची ओळख म्हणजे सध्याचे मनसेचे एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील हे रमेश पाटील यांचे लहान भाऊ आहेत.

१०. प्रकाश भोईर

२००९ साली निवडून आलेल्या नावांपैकी आणखी एक नाव म्हणजे प्रकाश भोईर. २००९ साली ते कल्याण पश्चिम मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर विजयी झाले होते. त्यांनी शिवसेनेच्या राजेंद्र देवळकर यांना पराभूत केले होते. सध्या प्रकाश भोईर मनसेमध्येच आहेत.

११. मंगेश सांगळे

२००९ च्या विधानसभा निवडणुकीत मंगेश सांगळे यांनी विक्रोळी मतदारसंघातून विजय मिळवला होता. २०१४ मध्येही त्यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली. पण त्यांचा पराभव झाला. पुढे २०१७ मध्ये त्यांनी भाजपत प्रवेश केला आणि महानगरपालिका निवडणूक लढवली. मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

१२.  शिशिर शिंदे

एकेकाळी शिवसेनेमध्ये असलेले शिशिर शिंदे राज ठाकरेंसोबत मनसेत आले. २००९ साली त्यांनी भांडूप पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवत विजय मिळवला. २०१४ साली त्यांनी पुन्हा मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली पण पराभव झाला. २०१८ साली ते पुन्हा शिवसेनेत गेले.

१३.  रमेश वांजळे

गोल्डमॅन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रमेश वांजळेंनी २००९ साली पुण्यातील खडकवासला मतदारसंघातून मनसेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. २०११ मध्ये त्यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यावेळच्या पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आला. पण रमेश वांजळे यांच कुटुंब सध्या राष्ट्रवादीत आहेत.

तर एकंदरीत मनसेच्या पहिल्या निवडणुकीत निवडून आलेल्या १३ पैकी अनेकजण सोडून गेले तरी काही लोक आजही सोबत आहेत. पण २००९ नंतर मनसेला यश मिळवता आलं नाही. २०१४ आणि २०१९ दोन्ही वेळी फक्त एकच आमदार निवडून आणता आला. २०१४ साली त्यांचा एकच आमदार निवडून आला होता. शरद सोनावणे जुन्नर मतदारसंघातून आमदार झाले होते. पण तेही सध्या शिवसेनेत आहेत. पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूका आहेत, राज ठाकरे नव्याने तयारीला लागले आहेत. 

चर्चा तर होणारच ! उद्धव ठाकरे-फडणवीसांची विधानभवनात एकत्र एन्ट्री

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube