‘महाराष्ट्रात एवढे प्रश्न, पण नुसतीच निष्फळ बडबड’

‘महाराष्ट्रात एवढे प्रश्न, पण नुसतीच निष्फळ बडबड’

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. महाराष्ट्रात सध्या जे सुरु आहे, त्याला राजकारण म्हणता येणार नाही. महापुरुषांबद्दल अवमानजनक वक्तव्यं केली जात आहेत. महाराष्ट्रात एवढे मोठे प्रश्न असताना नुसतीच निष्फळ बडबड केली जात आहे. जाती-जातींमध्ये तेढ निर्माण केली जात आहेत. कोणी कशावरही बोलायला लागलंय. कोणीही इतिहास तज्ज्ञ होताहेत. कारण हे सगळं टीव्हीवर दाखवलं जातंय, अशी टीका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. पुण्यामध्ये सुरू असलेल्या 18 व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाच्या एका मुलाखत कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते.

महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत. पण माध्यमांमध्ये फक्त राणे काय बोलले, राऊत काय बोलले, हेच सुरू आहे, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमकपणे माध्यमांवरही टीका केलीय. यावेळी ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरली आहे. राजकारण दिशाहीन झाल्याचं चित्र आहे. माध्यमांमध्ये देखील क्रिया आणि प्रतिक्रिया याच्यापलीकडं काहीच दिसत नाही.

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातून बाहेर गेलेल्या उद्योगांवरही राज ठाकरेंनी भाष्य केलंय. ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्रातून एखादा उद्योग दुसऱ्या राज्यात गेल्यानं काही फरक पडत नाही. महाराष्ट्राने आहे ते टिकवून ठेवले तरी महाराष्ट्र नेहमीच पुढे राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही राज ठाकरेंनी यावेळी जोरदार टीका केलीय.

त्याचवेळी राज म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाकडं लक्ष दिलं पाहिजे. आपण गुजरातचे आहोत, म्हणून फक्त गुजरातला प्राधान्य देणं, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शोभत नाही, अशा तिखट शब्दांत राज ठाकरे यांनी चौफेर टिका केलीय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube