पोहेगाव पोलीस दुरुक्षेत्र कार्यालय पूर्ववत सुरु करा, आ.आशुतोष काळेंच्या पोलीस अधीक्षकांना सूचना
MLA Ashutosh Kale : कोपरगाव तालुक्यातील शिर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहेगाव येथे नुकत्याच सुवर्ण पेढीवर पडलेल्या दरोड्याच्या घटनेमुळे कार्यकर्त्यांनी केलेल्या मागणीनुसार पोहेगाव पोलीस दुरक्षेत्र कार्यालय (पोलीस चौकी) पूर्ववत सुरु करा अशा सूचना आ. आशुतोष काळे (MLA Ashutosh Kale) यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला (Rakesh Ola) यांना केल्या आहेत अशी माहिती कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय शिंदे (Sanjay Shinde) यांनी दिली आहे.
पोहेगाव (Pohegaon) येथे मंगळवार (दि.21) रोजी सायंकाळी 5.45 च्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव ग्रामपंचायत हद्दीतील व्यापारी संकुलात तालुक्यातील कोळगाव थडी येथील रहिवासी असलेल्या ज्ञानेश्वर माळवे यांच्या सुवर्ण पेढीवर अज्ञात चार दरोडेखोरांनी हातात नंग्या तलवारी घेऊन लुटमारीचा केलेला प्रयत्न ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा चिरंजीव संकेत माळवे यांच्या प्रसंगावधानामुळे व पोहेगाव ग्रामस्थांच्या सतकर्तेमुळे जरी फसला तरी भरदिवसा अशी घटना घडल्यामुळे व्यवसायिकांबरोबरच नागरिकांमध्ये देखील दहशतीचे वातावरण पसरले आहे.
काही दिवसांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील येवला येथील व्यापाऱ्याला समृद्धी महामार्गालगत लुटण्याची घटना घडली होती. पोहेगाव परिसरासह व परिसरातील जवळपास अठरा गावातील नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोहेगावचे पोलीस दुरक्षेत्र कार्यालय मागील तीन ते चार वर्षापासून बंद आहे. पोहेगाव परिसरात सातत्याने घडत असलेल्या लुटमारीच्या पार्श्वभूमीवर पोहेगाव येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल रोहमारे, प्रवीण शिंदे, गंगाधर औताडे, माजी संचालक सुनील शिंदे, सचिन रोहमारे,पद्मविभूषण शरदचंद्र पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे, तसेच नंदकिशोर औताडे, राजेंद्र औताडे, मधुकर औताडे, नवनाथ जाधव, नरहरी रोहमारे, भाऊसाहेब सोनवणे, विशाल रोहमारे, वाल्मिक नवले आदी कार्यकर्त्यांनी आ.आशुतोष काळे यांच्याकडे पोहेगाव पोलीस दुरक्षेत्र कार्यालय (पोलीस चौकी) पूर्ववत सुरु करण्याबाबत आग्रही मागणी केली होती.
त्या मागणीची दखल घेवून आ.आशुतोष काळे यांनी पोलीस अधिक्षक राकेश ओला यांच्याशी संपर्क करून त्यांना पोहेगाव पोलीस दुरक्षेत्र कार्यालय (पोलीस चौकी) पूर्ववत सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच पोहेगाव शिर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असल्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती होवू नये यासाठी पोहेगाव व परिसरात पोलीस गस्त वाढविण्याच्या सूचना पोलीस उपविभागीय अधिकारी शिरीष वामने यांना दिल्या आहेत.
किशोर माळवे व त्यांच्या मुलाच्या धाडसीपणाचे आ.आशुतोष काळेंनी केले कौतुक
दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवून ज्ञानेश्वर माळवे यांची सुवर्ण पेढीची लुटमार करून लुटलेले सोने घेवून जात असतांना ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा संकेत माळवे यांनी जीवाची पर्वा न करता व दरोडेखोरांशी झटापट केली. त्यावेळी झालेल्या झटापटीत हे दोघेही जखमी झाले होते.
‘रुसू बाई रुसू गावी जाऊ बसू म्हणत ठाकरेंचा शिंदेंना टोला अन् तुफान फटकेबाजी
आ.आशुतोष काळे सध्या परदेश दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी जखमी ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा संकेत माळवे यांच्या प्रकृतीची कार्यकर्त्यांमार्फत आस्थेवाईकपणे चौकशी करून माहिती घेतली. ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा संकेत माळवे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रसंगावधान राखले व पोहेगाव ग्रामस्थांनी देखील दाखविलेल्या सतकर्तेमुळे मोठा अनर्थ टळला व दरोडेखोर पकडण्यात यश आले त्याबद्दल ज्ञानेश्वर माळवे व त्यांचा मुलगा संकेत व पोहेगाव ग्रामस्थांचे आ. आशुतोष काळे यांनी कौतुक केले आहे.