भाजप आमदाराच्या गोळीबार प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन : फरार रणजीत यादवला अटक

भाजप आमदाराच्या गोळीबार प्रकरणाचे अहमदनगर कनेक्शन : फरार रणजीत यादवला अटक

अहमदनगर : भाजप आमदार गणपत गायकवाड (Ganpat Gaikwad) गोळीबार प्रकरणात आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. गायकवाड यांचा फरार चालक रणजीत यादव याला पोलिसांनी अहमदनगर जिल्ह्यात बेड्या ठोकल्या आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर चौकशीमध्ये त्याचे नाव आढळले होते. मात्र तो पोलिसांच्या हाताला लागत नव्हता. त्यानंतर आता त्याला अटक करण्यात आली आहे. (Police have arrested Ranjit Yadav, his absconding driver, in Ahmednagar district, in connection with the shooting of BJP MLA Ganpat Gaikwad)

मिळालेल्या माहितीनुसार, 36 वर्षीय रणजीत यादव गणपत गायकवाड यांचा अत्यंत जुना ड्रायव्हर आहे. मागील 10 वर्षांपासून तो त्यांच्याकडे कामाला आहे. पोलिसांनी सुरुवातीला दाखल केलेल्या गुन्ह्यात त्याचे नाव नव्हते. मात्र सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर रणजित यादव गोळीबारानंतर केबिनमध्ये येऊन गणपत गायकवाड यांना संरक्षण देताना दिसत आहे. पण त्यानंतर तो फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध लुक आऊट नोटिसही जारी केलेली होती. आता मात्र त्याला अटक करण्यात आली असून 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठही सुनावण्यात आली आहे.

वैभव गायकवाड आणि नागेश बडेकरचा शोध सुरु :

या प्रकरणात आतापर्यंत स्वतः आमदार गायकवाड, त्यांचा समर्थक आणि व्यवसाय भागीदार विक्की गणात्रा, अंगरक्षक हर्षल केणे, संदीप सरवणकर, चालक रणजीत यादव अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर वैभव गायकवाड आणि नागेश बडेकर यांचा शोध सुरु आहे. रणजीत यादवप्रमाणेच वैभव गायकवाड याचेही नाव सुरुवातीला गुन्ह्यामध्ये नव्हते. मात्र चौकशीमध्ये त्याचे नाव पुढे आले आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध लुक आऊट नोटिसही जारी केलेली आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube