Prime Minister Narendra Modi : ब्रिटिशांनी भारतावर इंग्रजी लादले… आम्ही मातृभाषेतून शिक्षण देणार!
मुंबई : देशाला विकास महत्वाचा आहे. पण त्याचबरोबर परंपरा, वारसाही तितकाच महत्वाचा आहे. ब्रिटिशांनी भारतावर इंग्रजी लादले. पण आमची प्राथमिकता मातृभाषेतून शिक्षण देणे ही आहे. तसेच जलसंवर्धनात बोहरा समाजाचे मोठा वाटा आहे. बोहरा समाजाने वेळोवेळी स्वतःला सिद्ध केले आहे, बोहरा समाज आज सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे. परदेशात गेलो तरी बोहरा समाजातील (Bohara Community) लोकं मला आवर्जून भेटायला येतात, असे सांगत बोहरा समाजाच्या चार पिढ्यांच्या आठवणी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी यावेळी जागवल्या.
दाऊदी बोहरा मुस्लिम समाजाच्या मुंबईतील मरोळ येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘अलजामिया तूस सैफीया’ या शैक्षणिक संकुलाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दाऊदी बोहरा समाजाचे धर्मगुरु, नेते आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महिलांच्या शिक्षणासाठी मोठे योगदान बोहरा समाजाचे आहे. बोहरा समाज आणि माझं कौटुंबिक नातं आहे. या समाजाच्या चार पिढ्यांशी मी जोडला गेलो आहे. म्हणून मी आज या कार्यक्रमात आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून आलो आहे. पंतप्रधान म्हणून नाही. बोहरा समाजाने सातत्याने स्वतःला सिद्ध केले आहे. देशाच्या वाटचालीत बोहरा समाजाचे मोठे योगदान आहे.