कार्यकारिणी भाजपची, चर्चा मात्र पोलीस अधिकाऱ्याच्या फिल्डिंगची…
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)
पुणे : भारतीय जनता पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात झाली. या बैठकीत केंद्रापासून राज्यातील अनेक मोठे नेते आणि मंत्री यांनी उपस्थिती लावली. सर्व मोठे व्हीव्हीआयपी नेते असल्याने पोलीस बंदोबस्त देखील चोख ठेवण्यात आला होता. पुण्याच्या अनेक चौकात अनेक पोलीस कर्मचारी उन्हा तान्हात काम करत होते. तसा बंदोबस्त बालगंधर्व रंगमंदिरा बाहेर देखील लावण्यात आला होता. या सर्वांवर नजर ठेवण्यासाठी वरीष्ठ अधिकारी यांची धावपळ सुरु होती.
या सर्व कार्यकारिणी बैठकीच्या वेळी पुण्यातील एक वरीष्ठ पोलीस अधिकारी विशेष लक्ष वेधून घेत होता. एखादा बडा नेता अथवा मोठा मंत्री आल्यानंतर हा अधिकारी कडक सॅल्युट ठोकायचा, त्याच्याशी बातचीत सुरू व्हायची. चर्चेत जिल्ह्यात बदलीचा विषय निघायचाच. आपल्या जिल्ह्यात पद रिक्त होणार आहे. त्यासाठी इच्छुक असल्याचे निदर्शनास आणून द्यायचा.
विशेषत: पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक, ठाणे या जिल्ह्यातील सर्व नेते आणि मंत्री यांच्यावर या आधिकाऱ्याने विशेष लक्ष दिले होते. पश्चिम महारष्ट्रामधील एका मोठ्या मंत्र्यांसोबत हा अधिकारी बोलत होता. त्यावेळी चर्चेत एका व्यक्तीने आपण वाशिम जिल्ह्यात येण्यास इच्छुक असाल तर सांगा. आमचे जिल्ह्यात लवकर जागा रिक्त होणार आहे.
यानंतर अधिकाऱ्याने स्पष्ट शब्दात नकार दिला. विदर्भ नको , पश्चिम महाराष्ट्र, मुंबई जवळ हवी आहे अस स्पष्ट शब्दात बोलून गेला. ही चर्चा संपवून मंत्री जायला निघाले. या अधिकाऱ्याने पुन्हा कडक सेल्यूट ठोकत मंत्र्यांचे लक्ष वेधून घेतलं.
सांगलीचा नेता गेल्यावर गेटवर अहमदनगरचे मोठे नेते आले. या अधिकाऱ्याने तात्काळ आपला मोर्चा अहमदनगरच्या मोठ्या नेत्याकडे वळवला. ही सर्व गंमत पाहणाऱ्या पारखी लोकांच्या समूहाने एकमेकांकडे पहात काय चाललंय असे हावभाव करत डोळे फिरकवले. पण सॅल्युटची चर्चा चांगलीच होती.