बीजमाता राहीबाईंचा आवाज दाबण्याचा प्रयत्न
अहमदनगर : जिल्ह्यातील आदिवासी भागातील राहीबाई पोपरे या देशी बियाणे संग्रहाक म्हणून देशभर प्रसिद्ध आहेत. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना भारत सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले.
मात्र या राहीबाईंचे भाषण राष्ट्रीय पातळीवरील एका विज्ञान विषयक कार्यक्रमात बंद करण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेचे पडसाद सोशल मीडियाच्या माध्यमातून उमटू लागले आहेत.
नागपूरमधील १०८ वी इंडियन सायन्स काँग्रेसमध्ये महिला सायन्स काँग्रेस असा एक उपक्रम झाला. महिलांच्या प्रगतीसाठी विज्ञानाचा उपयोग असा उदात्त विषय यासाठी घेण्यात आला होता. उद्घाटक म्हणून राहीबाई पोपरे यांना निमंत्रित करण्यात आले होते.
उद्घाटनच्या भाषणात बोलताना राहीबाई यांनी लहानपणापासूनच आपला खडतर प्रवास आणि यशोगाथा सांगितली. यावेळी त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. त्या म्हणाल्या की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दोन वेळा भेटले. पहिल्या भेटीत त्यांनी माझे गाव कोंभाळणे येथे येण्याचे आश्वासन दिले होते.
या भेटीत ते माझे पर्यावरण व बीज संरक्षणविषयक काम पाहणार होते. त्यानंतर २०२१ मध्ये पद्मश्री पुरस्कार घेण्यासाठी मी राष्ट्रपती भवन येथे गेले.
त्यावेळी पंतप्रधान मोदी यांची दुसऱ्यांदा भेट झाली. त्यावेळी मी त्यांना चर्चेदरम्यान तुम्ही माझ्या गावी येण्याचे आश्वासन दिले होते; मग आले का नाही, अशी थेट विचारणा केली. त्यावर दोन वर्षे कोरोना असल्यामुळे शक्य झाले नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.’ असे सांगून या आपला भाग विकासात कसा मागे राहिला आहे, हे सांगत होत्या.
भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी त्यांना घर बांधून दिल्याचा किस्साही त्यांनी सांगितला. पुढे पंतप्रधान मोदी व भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडे केलेल्या मागण्यांची यादीही त्यांनी सांगितली. हीच गोष्ट संयोजकांना खटकली असावी.
संयोजकांनी त्यांच्या जवळ जाऊन त्यांना भाषण थांबविण्यास सांगितले. एवढेच नाही तर त्यांचा माईकही बंद केला. या घटनेचे पडसाद सोशल मीडियावर उमटू लागले आहेत.