ब्रेकिंग : महापौर आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरला; वेळ, ठिकाणाबाबत अधिसूचना निघाली

मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर यांसारख्या मोठ्या शहरांसह राज्यातील २९ महापालिकांमध्ये आरक्षणाची ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे

  • Written By: Published:
ब्रेकिंग : महापौर आरक्षण सोडतीचा मुहूर्त ठरला; वेळ, ठिकाणाबाबत अधिसूचना निघाली

Maharashtra Mayor Reservation Draw Update : राज्यातील 29 महापालिका निवडणुकांचा नुकताच निकाल जाहीर झाला, त्यानंतर सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे लागले होते. आता त्याबाबतचा मुहूर्त ठरला असून, वेळ ठिकाणाबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर यासारख्या मोठ्या शहरांसह सर्वच महापालिकांमध्ये आरक्षणाची ही सोडत अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

कधी निघणार सोडत?

नगर विकास विभागाच्या पत्रानुसार, ही सोडत राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. मंत्रालयातील 6 व्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी 11 वाजेपासून या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठीचे महापौरपद निश्चित केले जाणार आहे.

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने एकत्रितपणे लढत दिली होती. निकालांनुसार भाजपाचे 89 तर शिवसेना शिंदे गटाचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे या दोन्ही पक्षांची युती मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करणार, हे जवळपास निश्चित मानले जात आहे. मुंबईसह राज्यातील तब्बल 19 महापालिकांमध्ये भाजपनं विजयी घोडदौड कायम ठेवली. पिंपरी-चिंचवड आणि पुण्यातही अजित पवारांना मोठा धक्का देत भाजपनं एकहाती सत्तेचा सोपान गाठलाय. तर नागपूरमध्येही भाजपनं आपला गड अबाधित ठेवलाय. त्याचप्रमाणे संभाजीनगरमध्येही ठाकरेंच्या वर्चस्वाला शह देत सत्ता खेचून आणली.

चक्राकार पद्धतीनं निघणार सोडत

महापौर आरक्षणाची रोटेशन पद्धत बदलण्याबाबत चर्चा सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. पुन्हा ओपनपासून सुरुवात करत आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीनं महापौर आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. महापौरपदाचे आरक्षण चक्राकार पद्धतीने निश्चित करण्यात येते. समाजातील सर्व घटकांना महापौर पदाची संधी मिळावी, यासाठी चक्राकार पद्धतीने आरक्षणाची सोडत काढण्यात येते. सध्या कायद्यात एससी, एसटी, महिला आणि ओबीसींसाठी रोटेशनने आरक्षण आहे. मात्र, नियमातील नव्या बदलानुसार चक्राकार पद्धत नव्यानं सुरु केली जाऊ शकते.

follow us