समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांचा धुमाकूळ; संभाजीनगरमधील कुटुंबाला 18 लाखांना कसे लुटले ?

Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील मलढोण व दुशिंगपूर शिवारात गुरुवारी मध्यरात्री लुटीच्या घटना घडल्यात. गुरुवारी मध्यरात्री लुटारुंनी दीड तास धुमाकूळ घातला.

  • Ashok Parude
  • Written By: Published:
Samruddhi Expressway Robbery

Samruddhi Expressway robbery : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर भीषण अपघात होतात. आता या महामार्गावर दरोडेखोर दहशत घालू लागलेत. या महामार्गावर आतापर्यंतचा सर्वात मोठी तब्बल 18 लाखांची चोरी झालीय. तसेच दोन व्यावसायिकांना लुटण्यात आलंय. गुरुवारी रात्री समृद्धी महामार्गावर (Samruddhi Expressway ) दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला आहे.

समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील मलढोण व दुशिंगपूर शिवारात गुरुवारी मध्यरात्री लुटीच्या घटना घडल्यात. गुरुवारी मध्यरात्री लुटारुंनी दीड तास धुमाकूळ घातला. लुटारूंनी महामार्गावर लोखंडी धारदार वस्तू टाकून वाहनांची टायर फोडली. छत्रपती संभाजीनगर येथील अॅड. श्रीकांत मिश्रा हे कुटुंबीयांसह कारने मुंबईकडे जात होते. रात्री पावणेबाराच्या सुमारास लोखंडी वस्तू टायरमध्ये अडकून त्यांच्या गाडीचे टायर फुटले. मिश्रा यांनी प्रसंगावधान राखत वेग नियंत्रित करून गाडी थांबवली. त्यावेळी रस्त्याच्या बाजूला दबा धरून बसलेल्या 10 ते 12 जणांच्या दरोडेखोरांनी टोळक्याने गाडीला घेराव घातला. लोखंडी रॉड व दांडक्यांनी मिश्रा यांना मारहाण सुरू केली. दरोडेखोरांनी वाहनातील लहान मुलांना बाहेर काढून ओलिस ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घाबरलेल्या कुटुंबीयांनी अंगावरील सोन्याचे दागिने, घड्याळे व रोख 84 हजार 500 रुपये असा 18 लाखांचा एेवज चोरट्यांच्या ताब्यात दिला आहे.


सुभाष चंद्रा यांच्या प्रकरणामुळे ‘हेअरकट’ पुन्हा चर्चेत; बँका हजारो कोटींचे कर्ज का सोडतात?


व्यावसायिकाकडून दरोडेखोरांवर गोळीबार

त्यानंतरही दरोडेखोरांनी लूट सुरू ठेवली. वाहन व्यावसायिक मोहम्मद फरहान अब्दुल वहीद ऑगस्टच्या रात्री कुटुंबासह कारने नांदेडकडे येत होते. दरोडेखोरांनी त्यांच्या वाहनावर खिळे फेकल्याने गाडी पंक्चर झाली. गाडी थांबताच हातात धारदार हत्यारे घेतलेले 12 ते 13 दरोडेखोर कारच्या दिशेने धावले. मात्र मोहम्मद फरहान यांनी प्रसंगावधान राखत दरोडेखोरांच्या दिशेने गोळीबार केला. त्यामुळे दरोडेखोर पसार झाले. त्यानंतर हिंगोलीतील वाहनावर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न केला.


सुभाष चंद्रा यांच्या प्रकरणामुळे ‘हेअरकट’ पुन्हा चर्चेत; बँका हजारो कोटींचे कर्ज का सोडतात?


दिवसा-ढवळ्या व्यावसायिकाला अडीच लाखांना लुटले

गुरुवारी दुपारीही दरोडेखोरांनी महामार्गावर एका उद्योजकाला लुटले आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी येथील उद्योजक साहिल सतीश सोनवणे हे मित्रांसह उत्तराखंड येथून देवदर्शन करून नाशिकच्या दिशेने परतत होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ओव्हरटेक लेनमध्ये काळ्या रंगाच्या सेल्टॉस, पांढऱ्या रंगाची क्रेटा आणि काळ्या रंगाच्या एक्सयुव्ही अशा तीन आलिशान गाड्यांनी त्यांच्या फॉर्म्युनरला अडवण्याचा प्रयत्न केला. साहिल यांनी गाडीचा वेग वाढवून पळवण्याचा प्रयत्न केला. मात्र, दरोडेखोरांनी सुमारे तीन ते चार किलोमीटर पाठलाग केला. हडस पिंपळगाव टोलनाक्याजवळ एक एसयूव्ही कार पुढे गाडी आडवी लावली. एका दरोडेखोराने ‘मागे काही तरी झाले आहे, गाडी बाजूला घ्या’ असा बनाव केला होता. साहिल यांनी गाडी उभी करताच तीन वाहनांनी ‘फॉर्म्युनर’ला तिन्ही बाजूंनी घेरले. उतरलेल्या 10 ते 11 जणांपैकी एकाने साहिल यांना मारहाण करून गळ्यातील अडीच तोळ्यांची सोन्याची साखळी हिसकावली. साहिल यांनी मी स्थानिक आहे आणि तुमच्या चेहऱ्यासह सगळी घटना कारच्या डॅश कॅमेऱ्यात रेकॉर्ड होत आहे, असे सांगताच दरोडेखोरांनी पळ काढली आहे. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावर रात्री वेगाने वाहने जात असतात. त्यात हा भाग निर्मुष्य आहे. त्यामुळे दरोडेखोरांना रस्त्यावर वाहने पंक्चर करून लुटीचा नवा उद्योग सुरू केला आहे. रात्रीच्या वेळी महामार्गावर लुटीच्या इतक्या घटना घडत असताना हायवे पोलिस काय करतात, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

follow us