गडाख-घुलेंच्या विवाह सोहळ्यात सत्यजित तांबे-शुभांगी पाटील आमने-सामने
अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे(Satyajeet tambe) आणि महाविकास आघाडीचा पाठिंबा असलेले अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील(shubhangi patil) आज एकमेकांसमोर आमने-सामने आले. माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे सुपुत्र आणि चंद्रशेखर घुले यांच्या कन्येचा विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला या दोन्ही उमेदवारांनी हजेरी लावली.
या विवाह सोहळ्याला सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील दोघेही समोरासमोर आले होते. यावेळी सत्यजित तांबे विवाह सोहळ्यात जात होते. त्याचवेळी शुभांगी पाटील विवाह सोहळा पार पडल्यानंतर पाटील सोहळ्याबाहेर चालल्या होत्या.
त्याचवेळी सत्यिजत तांबे यांचा पाटील यांच्याशी आमना-सामना झाल्याचं दिसून आलं. यावेळी दोघाही उमेदवारांनी एकमेकांशी न बोलता पुढे सरसारवले आहेत. जेव्हा दोघेही एकमेकांसमोर आले होते तेव्हा बघणाऱ्यांच्या नजरा त्यांच्याकडे फिरल्या होत्या.
नगर जिल्ह्यातील दोन नेते आता एकमेकांचे व्याही झालेत. ज्येष्ठ नेते यशंवराव गडाख यांचे नातू आणि शिवसेनेचे माजीमंत्री शंकरराव गडाख यांचे सुपुत्र उदयन गडाख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची मुलगी डॉ. निवेदिता घुले यांचा शाही विवाह सोहळा पार पडला.
या सोहळ्याला राज्यभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली आहे. या विवाह सोहळ्याची मागील अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. एकेकाळी राजकारणावरुन त्यांच्यात संघर्ष सुरु होता. अखेर आता नव्या नात्यामुळे त्यांच्यातील दुरावा दुर झाला आहे.
दरम्यान, नाशिक आणि नागपूर मतदारसंघासाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षाकडून जोरदार तयारी सुरु असून अशातच या विवाह सोहळ्यात अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली असून सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्या उपस्थितीमुळे विवाह सोहळ्यात एकच चर्चा रंगली होती.