शरद पवारांनी ध्यानात ठेवलयं; पहिला झटका ‘मानस पुत्रालाच’ देणार!

शरद पवारांनी ध्यानात ठेवलयं; पहिला झटका ‘मानस पुत्रालाच’ देणार!

NCP Political Crises : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार बाह्या सरसावून मैदानात उतरले आहेत. बंडाला 24 तास होण्यापूर्वीच त्यांनी थेट कराड गाठून दिवगंत यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केलं. त्यानंतर कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीत शक्तीप्रदर्शन करत बंडखोरांना जागा दाखवून देणार असल्याचे सांगितले. यानंतर साताऱ्यात बोलताना पवार यांनी महाराष्ट्राच्या झंझावाती दौऱ्याविषयी माहिती दिली. (Sharad Pawar will hold the first meeting in Ambegaon, the constituency of Dilip Walse Patil)

बंडानंतर शरद पवार आता पहिला झटका त्यांचे ‘मानस पुत्र’ मानले जाणाऱ्या दिलीप वळसे पाटील यांनाच देणार आहेत. महाराष्ट्राच्या दौऱ्यामध्ये ते पहिली सभा अजित पवारांसोबत शपथ घेतलेल्या 9 आमदारांपैकी एक असलेल्या दिलीप वळसे पाटलांचा मतदारसंघ आंबेगाव येथे घेणार आहेत. अजित पवार यांचं बंड किंवा नाराजी शरद पवार यांना अपेक्षितच होते. गेले काही वर्ष पवार यांना अजितदादांच्या नाराजीविषयीची पूर्ण कल्पना होती. ही नारीज दूर करण्याचे काम पवार यांनी वेळोवेळी वळसे पाटील यांच्यावरच सोपवले होते.

वळसे पाटील बोलले म्हणजे पवार यांचेच ते मत आहे अशी धारणा राष्ट्रवादी आणि इतर पक्षातही होती. प्रफुल्ल पटेल-अजित पवार हे 2019 पासूनच राष्ट्रवादीने भाजपसोबत जावं या मतासाठी आग्रही होते. त्या गटात दिलीप वळसे पाटील नव्हते. शरद पवार जिकडे जातील तिथंच वळसे पाटील हे गृहीत होतं. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी वळसे पाटील यांच्या निकटवर्तीयांवर प्राप्तीकर खात्याने छापेमारी केली होती. यामुळे वळसे पाटील देखील भाजपसोबत जावं आणि कटकट संपवावी या मताचे झाले असे बोलले जाते. मात्र पवारांसाठी हा धक्का होता.

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा यांनी देखील वळसे पाटील यांना मानस पुत्र मानले होते. मात्र आपणच बोट धरुन राजकारणात आणलेला मुलगा आपल्याचविरोधात बंडखोरी करेल याची कल्पनाही पवार यांनी कधी केली नसावी. त्यामुळेच अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या बंडखोरांमध्ये पहिला धडा हा वळसे पाटील यांनाच शिकविण्याचे मनावर घेतले आहे.

शरद पवार-वळसे पाटील यांचं नातं पिता-पुत्राप्रमाणे :

महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील यांचं नातं पिता-पुत्राप्रमाणे मानलं जात होतं. दिलीप वळसे पाटील यांचे वडील आंबेगावचे माजी आमदार दत्तात्रय वळसे पाटील आणि शरद पवार यांची घनिष्ठ मैत्री होती. दत्तात्रय वळसे पाटील यांच्यामुळेच दिलीप वळसे पाटील पवारांना भेटले. पवार यांनी त्यांना राज्य सहकारी बँकेत नोकरीला लावले. पुढे पुलोदच सरकार गेल्यानंतर पवार विरोधी पक्षनेते झाले. त्यावेळी दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करु लागले.

जयंत पाटलांचा थेट अजित पवारांना झटका; शपथ घेणाऱ्या नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई

इथूनच त्यांची पवारांच्या सावलीत कारकीर्द सुरु झाली. तब्बल 8 वर्ष स्वीय सहाय्यक म्हणून काम केल्यानंतर 1990 साली शरद पवार यांनी वळसे पाटील यांना राजकारण की मंत्रालयातील काम असे दोन पर्याय ठेवले. त्यावेळी वळसे पाटील यांनी राजकारणाचा पर्याय निवडला. 1990 साली विधासभा निवडणकू जिंकून ते आमदार झाले. त्यानंतर ते सातत्याने आमदार म्हणून निवडून येत आहेत. कधी मंत्री तर कधी विधान सभा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं.

महाविकास आघाडी सरकारमध्ये गृहमंत्री कोणाला करायचे हा पेच त्यांच्यासमोर होता तेव्हा पवार यांनी वळसे पाटील यांच्या पारड्यात वजन टाकलं. कधी काळी पवारांनी बँकेत चिटकवलेला तरुण राज्याच्या गृहमंत्री झाला. मात्र आता हेच वळसे पाटील शरद पवार यांची साथ सोडून अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. शिंदे सरकारमध्ये ते मंत्रीही झाले आहेत. यानंतर आता पवार पहिला झटका आपल्या याच मानस पुत्राला देण्याच्या तयारीत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube