महागाई नियंत्रणात नाही, जनतेची लूट सुरू, एलपीजी दरवाढीवर शरद पवारांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
नियंत्रणाचा अर्थ टप्प्याटप्प्याने जनतेला धक्के देणे हा असेल, तर त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी चुकवावी लागेल - शरद पवार
Sharad Pawar’s question to Modi government : देशभरातील सर्वसामान्य नागरिक आधीच वाढत्या महागाईच्या झळा सहन करत असताना केंद्र सरकारने पुन्हा एकदा घरगुती बजेटवर मोठा आघात केला आहे. घरगुती वापराच्या 14.2 किलो एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 29 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या तीन महिन्यांतील ही दुसरी मोठी दरवाढ असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
या दरवाढीनंतर राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 913 रुपयांवरून 942 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तर मुंबईतही सिलिंडरचा दर 912.50 रुपयांवरून 941.50 रुपयांवर गेला आहे. यापूर्वी मार्च महिन्यातही घरगुती गॅसच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. दरवाढीवर बोलताना पवार म्हणाले, “सातत्याने दरवाढ केली जात आहे आणि त्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या संसारावर होत आहे.
पुण्यातील उमेदवार का मागे घेतला? कोणाच्या परवानगीने घेतला? जयकुमार गोरेंचे सुप्रिया सुळेंना सवाल
पंतप्रधानांनी सुरुवातीला महागाई नियंत्रणात असल्याचा दावा केला होता. मात्र, नियंत्रणाचा अर्थ टप्प्याटप्प्याने जनतेला धक्के देणे हा असेल, तर त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळी चुकवावी लागेल.” दरम्यान, एलपीजी उत्पादन करणाऱ्या सरकारी तेल कंपन्यांना अद्याप प्रत्येक घरगुती सिलिंडरमागे सुमारे 703 रुपयांचा तोटा सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आगामी काळात गॅसच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर 1 जून रोजी व्यावसायिक वापराच्या 19 किलो गॅस सिलिंडरच्या दरातही 42 रुपयांची वाढ करण्यात आली होती. विशेष म्हणजे, गेल्या पाच महिन्यांत कमर्शियल सिलिंडरचे दर जवळपास दुप्पट झाले आहेत. जानेवारीच्या सुरुवातीला 1580 रुपये असलेला सिलिंडर आता 3113.50 रुपयांपर्यंत पोहोचला आहे.
पेट्रोल, डिझेल, गॅस आणि अन्नधान्याच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित आधीच विस्कळीत झाले आहे. त्यातच गॅस दरवाढीचा नवीन फटका बसल्याने घरगुती खर्चाचा ताळमेळ घालणे अधिक कठीण होणार आहे. आगामी काळात महागाई आणखी वाढल्यास नागरिकांच्या अडचणी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.