भाजपमध्ये इनकमिंग सुरूच; ‘हा’ नेता शेकडो कार्यकर्त्यांसह करणार भाजपात प्रवेश

आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.

Shekap

महाराष्ट्रात महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला होता, महायुतीमधील अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता, तर महाविकास आघाडीनं (Shekap) या निवडणुकीत मोठं यश मिळवलं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीत त्यांना हे यश टिकवता आला नाही, राज्यात पुन्हा एकदा महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं.

विधानसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागा मिळाल्या तर दुसरीकडे महायुतीचा मोठा विजय झाला, राज्यात तब्बल 232 उमेदवार विजयी झाले, आणि पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं. या निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. दरम्यान, या निवडणुकीनंतर भाजप आणि महायुतीमध्ये जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला आहे, याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे.

मनसे शिवसेना युतीच्या हालचालींना वेग; राज ठाकरे थेट मातोश्रीवर, नक्की काय घडतय?

शिवसेना ठाकरे गटातील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवेसना शिंदे गटात प्रवेश केल्याचं पहायला मिळत आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गटातील अनेक नेत्यांनी देखील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपात प्रवेश केला आहे. मात्र, आता जो धक्का बसला आहे तो शेतकरी कामगार पक्षाला बसला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख आणि सध्याचे आमदार बाबासाहेब देशमुख यांचे कट्टर समर्थक असलेले व शेकापचे नेते बाळासाहेब एरंडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

बाळासाहेब एरंडे यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली, या बैठकीमध्ये त्यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे. शेकापच्या शेकडो कार्यकर्त्यांसह बाळासाहेब एरंडे हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, येत्या दहा ऑक्टोबर रोजी हा पक्ष प्रवेश होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे. दरम्यान पुढील काही महिन्यांमध्ये राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यापूर्वी हा शेकपसाठी मोठा धक्का मानला जात आहेत.

Tags

follow us