धक्कादायक! विद्यार्थ्यांना डमी शिक्षकाकडून शिक्षणाचे धडे

धक्कादायक! विद्यार्थ्यांना डमी शिक्षकाकडून शिक्षणाचे धडे

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील पारनेरच्या मांजरधाव प्राथमिक शाळेत एका शिक्षकाने स्वतःच्या जागेवर डमी शिक्षकाची नेमणूक केल्याचा धक्कादायक आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आलाय. विशेष म्हणजे दोन वर्ष हा प्रकार सुरू असल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येतंय.

जिल्हा परिषदेचे शिक्षक बाजीराव पानमंद यांनी आपल्या जागी एक खासगी बेरोजगार युवक कुलदीप जाधव याला शाळेत पाठवून विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी नेमणूक केली. ग्रामस्थांनी संबंधित शिक्षक दोन वर्षांपासून शाळेत शिकवत असल्याचं सांगितलंय, हा तोच व्हिडिओ आहे, ज्यामध्ये हा डमी शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतोय. हा डमी शिक्षक एका पतसंस्थेमधील कर्मचारी असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे.

शिक्षक बाजीराव पानमंद यांचीही प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली, नुकत्याच ग्रामपंचायत निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय द्वेषातून माझी बदनामी करण्यासाठी हा प्रयत्न असावा असं त्यांनी म्हटलंय. सोबतच मी रीतसर रजेवर आहे आणि येऊ घातलेल्या 26 जानेवारी रोजी शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याने कुलदीप जाधव यांना आपण सांस्कृतिक कार्यक्रम बसवण्यासाठी शाळेत बोलावले होते असं त्यांचं म्हणणं आहे.

अखेर ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर शिक्षण विभागाला शिक्षकावर कारवाई करणं भाग पडलंय. शिक्षकाला शाळेत येण्याबाबत बंदी घालण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब बुगे यांनी दिलीय. तसेच यासंदर्भात कारवाई करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.

दरम्यान, आदर्श समाज घडवण्यासाठी धडे गिरवत असलेल्या विद्यार्थ्यांना अशा डमी शिक्षकाकडून शिक्षण मिळत असेल तर विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेत शाळांमध्ये शिक्षण कसं घ्यावं? हा प्रश्न या संपूर्ण प्रकरणावरुन उपस्थित केला जात आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube