घरात भरपूर कॅश यायची, सगळं डॅडला माहिती, मुलाच्या विधानाने SIT तपासाला वेग, खरात प्रकरणाला नवं वळण
SIT कडून करण्यात आलेल्या सखोल तपासात अशोक खरातच्या मुलाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला.
Shocking revelations in the Ashok Kharat case : राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात प्रकरणात आता अतयंत महत्वाचे आणि धक्कादायक खुलासे समोर येऊ लागले आहेत. विशेष तपास पथकाच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणाला आता नवे आणि गंभीर वळण मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. SIT कडून करण्यात आलेल्या सखोल तपासात अशोक खरातच्या मुलाची चौकशी करण्यात आली. या चौकशीत पोलिसांनी त्याच्यावर प्रश्नांचा अक्षरशः भडीमार केला. वडिलांना भेटायला कोण कोण येत होते, बहिणीच्या लग्नात किती सोन्याचा व्यवहार झाला, घरातील खर्च कसा भागवला जात होता, आई पैसे कुणाकडे देत होती, तसेच परदेश दौरे आणि तंत्र-मंत्राशी संबंधित व्यवहार यांसारख्या अनेक संवेदनशील मुद्द्यांवर प्रश्न विचारण्यात आले.
मात्र या सर्व प्रश्नांना मुलाने एकाच उत्तर दिले, सर्व डॅडला माहिती. तरीही त्याने दिलेल्या एका महत्वाच्या कबुलीजबाबामुळे तपासाला वेग आला आहे. घरात मोठ्या प्रमाणात रोख रक्कम यायची, अशी कबुली त्याने दिल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या विधानामुळे अशोक खरात हवाला रॅकेट चालवत असल्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. तपास यंत्रणा आता या आर्थिक व्यवहारांचा माग काढण्यावर भर देत असून, गरज भासल्यास मुलाची पुन्हा चौकशी होऊ शकते, असे संकेत देण्यात आले आहेत.
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. अशोक खरातची पत्नी कल्पना खरात सध्या फरार असून, तिच्या शोधासाठी पोलिसांनी हालचाली तीव्र केल्या आहेत. तिच्याविरोधात शिर्डी पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. SIT च्या पथकाने कल्पना खरातच्या माहेरी, म्हणजेच सिन्नर तालुक्यातील पाडळी गावात जाऊन तपास केला. या तपासात समोर आलेली माहिती माहिती देखील तेवढीच धक्कादायक आहे.
कल्पना खरात गेल्या तब्बल 16 वर्षांपासून आपल्या माहेराशी कोणत्याही प्रकारचा संपर्क ठेवत नव्हती. एवढंच नव्हे, तर वडील आणि भावाच्या निधनाच्या वेळी देखील ती माहेरी आली नसल्याचं उघड झालं आहे. तिच्या माहेरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून कुटुंबीय शेती करून उदरनिर्वाह करत असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाशी आमचा कोणताही संबंध नसल्याचा दावा तिच्या नातेवाईकांनी केला आहे. सध्या अशोक खरात प्रकरणात तपास वेगाने सुरू असून, येत्या काळात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त केली जात आहे.