शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, आता ऊसतोडणी यंत्राला केंद्र सरकारकडून मिळणार अनुदान; काय आहेत अटी?

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, आता ऊसतोडणी यंत्राला केंद्र सरकारकडून मिळणार अनुदान; काय आहेत अटी?

Subsidy announced for sugarcane cutting machine : राज्यात दरवर्षी ऊस लागवडीच्या क्षेत्रात (sugarcane cultivation area) वाढ होत आहे. त्यामुळं ऊसतोड मजूरांची कमतरता भासत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी केंद्र सरकार पुढं सरसावलं आहे. अपुऱ्या मनुष्यबळामुळं गेल्या वर्षी ऊस तोडणीचा हंगाम लांबला होता. त्यामुळं ऊसतोडणी यंत्रे खरेदी (Sugarcane Harvesting Machines) करण्याची मानसिकता शेतकऱ्यांमध्ये वाढली होती. शासनाकडून ऊसतोड यंत्राला अनुदान नसतांनाही शेतकरी वर्ग ऊसतोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी कंपन्यांकडे चौकशी करत आहे. दरम्यान, उसतोडणीच्या कामात उद्भवलेली मनुष्यबळाची समस्या सोडवण्यासाठी ऊस तोडणी यंत्राला आता केंद्र सरकाने अनुदान देण्याचं जाहीर केलं आहे. हे अनुदान व्यक्तिगत, संस्था, खाजगी आणि सहकारी साखर कारखाने, सहकारी संस्था यांना देण्यात येणार आहे. यामुळं उसतोड कामगारांच्या कतरतेवर मार्ग काढणं शक्य आहे.

साखर आयुक्त पुणे यांनी एक प्रसिध्द पत्रक काढून याबाबतची माहिती दिली. या पत्रकारत सांगण्यात आलं की, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी वैयक्तिक शेतकरी, उद्योजक, सहकारी व खाजगी साखर कारखाने, शेती सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक संस्था यांना अनुदान उपलब्ध करुन देण्यास शासनाने २० मार्च २०२३ रोजी शासन निर्णयाद्वारे मान्यता दिलेली आहे. ही योजना कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलट्वारे राबविण्यात येणार आहे. ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी इच्छुक असणाऱ्या शेतकऱ्यांनी, वैयक्तिक व्यावसायिक यांनी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने ऊस तोडणी यंत्र खरेदीसाठी खाली नमूद केलेल्या प्रक्रियेनुसार अर्ज करावेत.

‘हा’ आमदार माझ्या नजरेला उभा राहत नाही; राणेंनी संग्राम जगतापांना डिवचले 

(अ) इच्छुक अर्जदारांनी महा-डीबीटी पोर्टलद्वारे अर्ज करणे :
कृषि विभागाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसीत केली आहे. या प्रणालीद्वारे अर्जदारांना त्यांच्या पसंतीच्या ऊस तोडणी यंत्र निवडीचे स्वातंत्र्य देण्यांत आले आहे. या योजनेतंर्गत पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. यामुळे योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता व सुसूत्रता येऊन वरिष्ठ स्तरावरून योजनांच्या अंमलबजावणी प्रगतीचे प्रभावी सनियंत्रण करणे शक्‍य होणार आहे.

(ब) योजनेचा लाभ घेण्याच्या दृष्टीने महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे टप्पे:

१) संकेतस्थळ :
http://mahadbtmaharashtra.gov.in/Farmer/login/login हे महा-डीबीटी पोर्टलचे संकेतस्थळ आहे. या संकेतस्थळावरील सूचनांप्रमाणे अर्ज भरावा. स्वतःचा मोबाईल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतमधील संग्राम केंद्र यासारख्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्जदार अर्ज करू शकतील.

२) अर्जदार नोंदणी : अर्जदारांनी प्रथमतः वापरकर्त्याचे नाव व पासवर्ड तयार करून नोंदणी पूर्ण करावी. त्यानंतर पुन्हा लॉग-इन करून त्यांचे प्रोफाईल तयार करावे. अर्जदारांना ऊस तोडणी यंत्रांना अनुदान या घटकासाठी “वैयक्तिक लाभार्थी/ उद्योजक” व “शेती सहकारी संस्था / शेतकरी उत्पादक संस्था/ साखर कारखाने” असे नोंदणी पर्याय उपलब्ध असतील.

अर्जदारांनी पर्याय निवडल्यानंतर महा-डीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याबाबत सविस्तर माहिती युजर मॅन्युअलद्वारे पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक घटकाने अर्ज कशा पद्धतीने करावा तसेच अर्जासोबत कोणकोणती कागदपत्रे अपलोड करावीत याबाबतची सविस्तर माहिती पोर्टलवर देण्यात आली आहे.

३) अर्जदाराने वैयक्तिक तपशील भरणे :
“वैयक्तिक लाभार्थी/ उद्योजक” म्हणून नोंदणी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः त्यांचा वैयक्तिक तपशील भरणे बंधनकारक आहे. या सदरामध्ये तारांकित (*) बाबींची माहिती देणे अनिवार्य आहे. सदर माहिती भरल्यानंतरच लाभार्थ्यांना ऊस तोडणी यंत्र अनुदान या घटकासाठी अर्ज करता येईल.

४) अर्ज शुल्क :
ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करताना अर्जदारांना रक्‍कम रु.२०/- अधिक रक्कम रु.३.६० पैसे वस्तू व सेवाकर असे एकूण रक्‍कम रू. २३.६० पैसे अर्ज शुल्क म्हणून ऑनलाईन भरावयाचे आहे.

५) तक्रार /सूचना :
अर्जदारांना अर्ज करतेवेळी काही अडचणी येत असतील अथवा काही सूचना करावयाच्या असल्यास ते महा-डीबीटी पोर्टलवरील “तक्रारी/ सूचना” या बटनावर क्लिक करून
आपली तक्रार/सूचना नोंदवू शकतील, असं या पत्रकात सांगण्यात आलं आहे.

साखर कारखाने व गटांसाठी अर्ज करण्याची सुविधा दि. २१ एप्रिल २०२३ पासून सुरू होईल.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube