सुधीर तांबे काँग्रेसमधून निलंबित; सोनिया गांधींच्या मान्यतेने निलंबनाची कारवाई

सुधीर तांबे काँग्रेसमधून निलंबित; सोनिया गांधींच्या मान्यतेने निलंबनाची कारवाई

नाशिक : पक्षाच्या आदेशाचं उल्लंघन करुन शिस्तभंग केल्याप्रकरणी डॉ. सुधीर तांबे यांच्यावर कॉंग्रेसकडून निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. यासंदर्भातील एक पत्रक कॉंग्रेसकडून प्रसिध्द करण्यात आलंय.

काँग्रेसच्या शिस्तपालन समितीचे अध्यक्ष तारिक अन्वर यांनी आज रविवारी डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे पत्र ट्विट केले. पक्षविरोधी भूमिका घेऊन शिस्त मोडल्याने ही कारवाई करण्यात येत असल्याचे या पत्रात म्हटले आहे.

कॉंग्रेस पक्षाशी दगाफटका केल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून करण्यात आला होता. सुधीर तांबे यांनी पदवीधर मतदासंघाच्या निवडणुकीत आपल्या मुलाचा अर्ज दाखल केल्यासंदर्भाचा अहवाल हायकमांडकडे पाठवण्यात आला होता. त्यानंतर आता त्यांच्यावर कारवाई करण्यात आलीय. त्यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत नाना पटोले यांनी आधीच स्पष्ट केले होते.

सुधीर तांबे यांनी कॉंग्रेसकडून नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी देण्यात आली होती. त्यांना पक्षाकडून एबी फॉर्मदेखील पाठवण्यात आला होता. मात्र, ऐनवेळी त्यांनी आपल्या मुलाचा अपक्ष अर्ज दाखल केला.

आपल्या मुलाचा अर्ज दाखल केल्यानंतर सत्यजित तांबे यांनी आपण भाजपची मदत घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर तांबे पिता-पुत्रांनी कॉंग्रेस पक्षाशी दगाफटका केला, फसवेगिरी केल्याचंही नाना पटोले यांनी म्हंटलं होतं.

दरम्यान, अखेर हायकमांडकडून आज सुधीर तांबे यांच्यावर कारवाई करत त्यांची चौकशी होईपर्यंत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. सुधीर तांबे यांच्यावर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मान्यतेने शिस्तपाल समितीने निलंबनाची कारवाई केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube