बारामती पोटनिवडणूक ठरली एकतर्फी; सुनेत्रा पवारांनी 2 लाखांहून अधिक मतांनी प्रतिस्पर्ध्यांना चारली धूळ
मतमोजणीला सुरुवात होताच त्यांनी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम राखत तब्बल 2 लाख 18 हजार 930 मतांनी दणदणीत विजय मिळवला.
Sunetra Pawar wins Baramati by-election : राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागून असलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल अखेर स्पष्ट झाला असून, या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांनी विक्रमी विजयाची नोंद करत आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं आहे. मतमोजणीला सुरुवात होताच त्यांनी आघाडी घेतली आणि शेवटपर्यंत ती कायम राखत तब्बल 2 लाख 18 हजार 930 मतांनी दणदणीत विजय मिळवला.
पुणे जिल्ह्यातील बारामती आणि अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी या दोन विधानसभा मतदारसंघांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांची मतमोजणी आज पार पडली. बारामतीत ही पोटनिवडणूक दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे झाली होती, तर राहुरीत भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर निवडणूक घेण्यात आली.
बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार या प्रमुख लढतीत होत्या आणि त्यांनी सुरुवातीपासूनच आघाडी घेत प्रतिस्पर्ध्यांना मोठ्या फरकाने मागे टाकलं. त्यांच्या विजयाचं विशेष महत्त्व म्हणजे त्यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी केलेला विक्रमही मोडीत काढला. त्या वेळी अजित पवार यांनी सुमारे 1 लाख 1 हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला होता; मात्र सुनेत्रा पवार यांनी हा फरक दुपटीहून अधिक वाढवत नवा इतिहास रचला आहे.
या निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून उतरलेल्या करून मुंडे यांना केवळ 85 मतांवर समाधान मानावं लागलं. पराभवानंतर त्यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया देत, निवडणूक लढण्याची संधी मिळणं हेच आपलं यश असल्याचं म्हटलं. माझा अर्ज वैध ठरला, तेव्हाच मी जिंकले होते. मला एक मत मिळो किंवा लाख मतं मिळो, मतदारांच्या निर्णयाचा मी पूर्ण आदर करते, असं त्या म्हणाल्या.
त्याचबरोबर त्यांनी सुनेत्रा पवार यांना विजयाबद्दल शुभेच्छा देत महिलांच्या सुरक्षेसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचं आवाहन केलं. राज्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असून त्याकडे प्राधान्याने लक्ष देणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. एकूणच, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय केवळ मोठा नाही, तर विक्रमी ठरला असून राज्याच्या राजकारणात हा निकाल एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट मानला जात आहे.