ही मागणी तर दुर्दैवी; सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंचा घणाघात, दिल्लीत हालचाली वाढल्या

धनुष्यबाण हे बाळासाहेब ठाकरे यांना प्राणाहून प्रिय होतं, अशी आठवण करून देत शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला.

  • ganesh pokale
  • Written By: Published:
News Photo   2026 09 01T190933.378

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Shinde) यांनी मंगळवारी अचानक दिल्ली गाठल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. कॅबिनेटची बैठक सोडून शिंदे दिल्लीला रवाना झाल्याने त्यांच्या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. 2 सप्टेंबरपासून सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी पुन्हा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाच्या वतीने होणाऱ्या युक्तिवादाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीत आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

दिल्लीत माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी सुप्रीम कोर्टातील आगामी सुनावणीबाबत माहिती दिली. राज्यप्रमुखांच्या बैठका असल्याने दिल्लीला येत असतो, असं सांगतानाच यापूर्वी झालेल्या सुनावणीचा आढावा घेतला असून बुधवारपासून शिवसेनेच्या बाजूने होणाऱ्या युक्तिवादाबाबतही चर्चा केल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र, शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची ठाकरे गटाची मागणी अत्यंत दुर्दैवी असल्याची टीका त्यांनी केली.

धनुष्यबाण हे बाळासाहेब ठाकरे यांना प्राणाहून प्रिय होतं, अशी आठवण करून देत शिंदे यांनी ठाकरे गटावर जोरदार निशाणा साधला. 2019 मध्येच बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्व आणि जनतेने दिलेला जनादेश गोठवण्याचं काम झालं, असा आरोप त्यांनी केला. आता धनुष्यबाण गोठवण्याची मागणी केली जात असून बाळासाहेबांचे विचार, भूमिका आणि राष्ट्रीयत्वाची विचारधारा पुसण्याचा प्रयत्न काही लोक करत असल्याचा टोला शिंदे यांनी लगावला. मात्र, आपण बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा वारसा घेऊन पुढे जात असून जनतेनेही आपल्याला स्वीकारल्याचा दावा त्यांनी केला.

शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा विषय न्यायप्रविष्ट असल्याने यावर अधिक भाष्य करणार नसल्याचंही शिंदे यांनी स्पष्ट केलं. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असतं आणि निर्णय त्याच आधारे होत असतो, असं सांगत त्यांनी न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असल्याचं नमूद केलं. काही लोक सर्वोच्च न्यायालयालाही मार्गदर्शन करतात, तर निवडणूक आयोगाबाबतही बेछूट आरोप केले जातात, असा टोला लगावत शिंदे यांनी आपली भूमिका त्यापेक्षा वेगळी असल्याचं सांगितलं. महाराष्ट्रातील जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिला आहे, हे महाराष्ट्रासह देशालाही माहित असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं.

Tags

follow us