Tehsildar Strike : तहसीलदार आणि नायब तहसीलदार आजपासून संपावर
मुंबई – जुन्या पेन्शनसाठी (Old Pension) गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्यातील सरकारी कर्मचारी संपावर गेले होते. आठ दिवस चाललेल्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले होते. आता राज्यातील नायब तहसीलदार (Naib Tehsildar) आणि तहसीलदार (Tehsildar) बेमुदत संपावर गेले आहेत. त्यामुळे 358 तालुक्यातील तहसील कार्यालयात शुकशुकाट असण्याची शक्यता आहे.
राजपत्रित वर्ग-2 नायब तहसीलदार या कार्यकारी पदाच्या विद्यमान ग्रेड-पे मुद्द्यावरुन हा संप पुकारण्यात आला आहे. नायब तहसीलदार हे पद वर्ग दोनचे असले तरी या पदाला इतर विभागांतील समकक्ष वर्ग दोनच्या पदापेक्षा कमी वेतन मिळते. त्यामुळे ग्रेड पे 4300 रुपयांवरुन 4800 रुपये वाढवण्याची त्यांची मागणी आहे.
Uddhav Thackeray ; आपण ज्या कॉलेजमध्ये शिकलो त्याचा अभिमान मोदींना का नसावा?
दरम्यान राज्य सरकारने 13 ऑक्टोबर 1998 रोजी नायब तहसीलदार संवर्गाचा दर्जा वर्ग तीनवरुन वर्ग दोन केला होता. मात्र वेतनवाढ केली नव्हती. मागील 25 वर्षांपासून राज्यातील नायब तहसीलदार वर्ग दोन या पदावर काम करतात. मात्र वर्ग तीनचे वेतन घेत आहेत. त्यामुळे नायब तहसीलदारांनाही इतर विभागांतील वर्ग दोनच्या अधिकाऱ्यांएवढा ग्रेड पे वाढवून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेने केली आहे.
राज्यातील 600 तहसीलदार आणि 2200 नायब तहसीलदार यांच्या बेमुदत संपामुळे तहसील कार्यालयात आज शुकशुकाट पाहायला मिळू शकतो. या आंदोलनामुळे राज्यातील महसूल विभागातील शासकीय यंत्रणा कोलमडणार असून याचा फटका मात्र सर्वसामन्य नागरिक, शेतकरी आणि विद्यार्थ्यांना बसणार आहे.