नांदेडमध्ये भीषण अपघात; आई-मुलगा-आत्या ठार, दुसऱ्या दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोन जखमींवर उपचार सुरू

नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हडसनी फाट्याजवळ बुधवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला.

  • Written By: Published:
Untitled Design 21

Terrible accident in Nanded : राज्यात अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. उन्हाळी सुट्ट्यांमुळे नागरिकांची गावाकडे आणि पर्यटनस्थळांकडे मोठ्या प्रमाणावर ये-जा सुरू आहे. परिणामी रस्त्यांवरील वाहतूक वाढली असून, त्याचबरोबर अपघातांच्या घटनांमध्ये देखील चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. अशातच नांदेड जिल्ह्यात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील हडसनी फाट्याजवळ बुधवारी रात्री सुमारे दहा वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात घडला.

भरधाव वेगाने येणाऱ्या कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या अपघाताची तीव्रता इतकी होती की चार जणांचा यात जागिरीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घटनास्थळी गर्दी केली. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा समावेश असल्यामुळे दुःख अधिकच तीव्र झाले आहे. निवघा बाजार येथील यशवंत नरवाडे हा आपल्या आई रेखाबाई आणि आत्या अनुसयाबाऊ लोणारे यांना घेऊन दुचाकीवरून जात होता.

हडसनी गावाजवळ पोहोचताच भरधाव वेगातील कारने त्यांच्या दुचाकीला आणि दुसऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की तिघे देखील दूरवर फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुसऱ्या दुचाकीवरील एक व्यक्ती देखील या अपघातात ठार झाला आहे. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांकडून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. प्राथमिक तपासात वाहनाचा वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटणे हे कारण समोर येत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अमेरिकेतील नागरिकत्व धोरणावरून राजकीय वातावरण तापलं; भारत-चीनला hellholes म्हणत ट्रम्प यांचा निशाणा

दरम्यान, राज्यातील दुसरी एक धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातून समोर आली आहे. साताऱ्यातील पाटखळ गावाच्या हद्दीत गुरुवारी पहाटे एक ट्रक थेट कालव्यात कोसळला. सुदैवाने या अपघातात चालक आणि क्लिनर बचावले असून, त्यांना कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाल करत कण्हेर आणि उरमोडी धरणातून होणार पाण्याचा विसर्ग काही काळासाठी थांबवला. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रक कालव्याबाहेर काढण्यात आला आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर विसर्ग पुन्हा सुरू करण्यात आला.

मात्र या सलग घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वाढती वाहतूक, बेफाम वेग, नियमांचं उल्लंघन आणि अपुरी रस्ते सुविधा ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. प्रशासनाने कठोर उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त केली जात असतानाच, नागरिकांनी देखील वाहतुकीचे नियम पाळण्याची जबाबदारी ओळखणे तितकेच महत्वाचे ठरणार आहे. या घटनांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, रस्त्यावरचा प्रत्येक क्षण सावधगिरीचा असतो. कारण एका क्षणाच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होऊ शकते.

follow us