Thackeray Vs Shinde : सुप्रीम कोर्टातील सुनावणी संपली, निकाल कधी येणार?
Thackeray Vs Shinde : सहा महिन्यापूर्वी झालेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षावर गेल्या काही दिवसापासून सुप्रीम कोर्टात युक्तिवाद चालू होता. सुप्रीम कोर्टातील संघर्षावरील आजचा दिवस शेवटचा ठरला आहे. आज ठाकरे गटाकडून रिजॉईन्डर करण्यात आले. आज सकाळपासून ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी आणि देवदत्त कामत यांनी युक्तिवाद केला. त्यांनतर आज न्यायालयाकडून दोन्ही गटाचा युक्तिवाद संपल्याचं जाहीर करण्यात आलं.
CJI DY Chandrachud: Our compliments to everyone, the juniors too.
Hearing concludes.#SupremeCourtOfIndia #ShivSenaCrisis #Maharashtra
— Live Law (@LiveLawIndia) March 16, 2023
युक्तिवाद संपला, निकाल कधी?
मागील एक महिन्यापासून सत्तासंघर्षावर युक्तिवाद चालू होता, अखेर आज युक्तिवाद संपला पण याचा निकाल कधी लागणार याची उत्सुकता आहे. ठाकरे आणि शिंदे गटासोबत संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागले आहे. आज सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला आहे पण तो कधी सांगितला जाईल, हे आज समजू शकलं नाही.
दरम्यान ज्या पाच न्यायाधीशाच्या बेंचसमोर ही सुनावणी चालू होती, त्या पाच न्यायमूर्तीपैकी न्यायमूर्ती शाह १५ मे रोजी निवृत्त होत आहेत. घटनापीठात समाविष्ट असलेल्या न्यायमूर्तीसमोरच हा निर्णय दिला जाणे अपेक्षित आहे. त्यामुळे १५ मे पूर्वी हा निकाल लागेल, असं सांगण्यात येत आहे.
घटनापीठासमोर १२ दिवस सुनावणी
सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीपासून सुरु झाली. तेव्हापासून आजपर्यंत १२ दिवस सुनावणी झाली. त्यातील पहिले ३ दिवस प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या पीठाकडे द्यायचे की नाही यावर युक्तिवाद झाला होता. त्यानंतर ९ दिवस ठाकरे आणि शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला.