‘तो’ व्यक्ती गेल्या सरकारच्या काळात एका पोलीस आयुक्ताच्या संपर्कात; फडणवीस यांचा इशारा कोणाकडे?

  • Written By: Published:
‘तो’ व्यक्ती गेल्या सरकारच्या काळात एका पोलीस आयुक्ताच्या संपर्कात; फडणवीस यांचा इशारा कोणाकडे?

“गेल्या सरकारच्या काळात एका पोलीस आयुक्ताच्या हा माणूस संपर्कात होता. पण पोलिसांत माहिती घेतली असता गेल्या सरकारच्या काळात त्याच्यावरचे गुन्हे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.” अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. विधिमंडळ अधिवेशनात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी एका डिझायनरविरोधात दाखल केलेल्या तक्रारीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या प्रकरणाची आज चर्चा सुरू आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावर स्पष्टीकरण देत सगळा घटनाक्रमच उलगडून सांगितला.

अमृता फडणवीस यांच्याकडून एफआयआर दाखल

फडणवीस म्हणाले, की माझी पत्नी अमृता फडणवीसने एक एफआयआर दाखल केला आहे की तिच्यावर दबाव आणून माझ्या माध्यमातून काही काम करून घेण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला पैसे ऑफर करण्यात आले आणि नंतर ब्लॅकमेल करण्यात आले. अनिल जयसिंघानी नावाचा एक व्यक्ती असून तो मागील सात ते आठ वर्षांपासून फरार आहे. त्यांची मुलगी आहे. ती शिकलेली आहे. ही मुलगी कधीतरी अमृताला भेटली होती.

पुढे मात्र तिने माझ्या वडिलांना चुकीच्या केसमध्ये फसवण्यात आले असून तुम्ही त्यांना सोडवा असे सांगितले. मात्र, अमृताने तिला सांगितले की तुला जे काही निवेदन द्यायचे आहे ते फडणवीसांना देऊन टाक. सरकार बदलल्यानंतर त्या मुलीने माझ्या वडिलांना फसविण्यात आल्याचे म्हणत त्यांना मदत करा. काही दिवसांनी म्हटली की माझे वडील सगळ्या बुकीजना ओळखतात.

मागील काळात आम्ही ही माहिती पोलिसांना द्यायचो आणि त्या ठिकाणा छापा टाकला जायचा. त्यावेळी आम्हाला दोन्हींकडून पैसे मिळायचे. तुम्ही जर मदत केली तर आपणही असे छापेमारी करवू शकतो. त्यावर अशा फालतू गोष्टी माझ्याबरोबर करायच्या नाहीत, असे अमृता यांनी त्या मुलीला ठणकावून सांगितले.

वडिलांना जेलबाहेर काढा

त्यानंतरही पुन्हा तिने असे करण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला होता. एकतर असा व्यवसाय करू नाहीतर माझ्या वडिलांना सोडविण्यासाठी मी एक कोटी देते. त्यांना जेलबाहेर काढा, अशी ऑफर तिने माझ्या पत्नीला दिल्याचे फडणवीस म्हणाले. त्यावेळी माझ्या पत्नीने स्पष्टपणे सांगितले की चुकीच्या पद्धतीने ते फसले असतील तर त्यांना सोडविता येणार नाही. पण तू मला हे सांगू नकोस.

यानंतर बुकींचा मुद्दा वारंवार यायला लागल्यानंतर अमृता फडणवीस यांनी त्या मुलीला ब्लॉक केले. ब्लॉक केल्यानंतर दोन दिवसांनी एका अनोळखी नंबरवरून मोठ्या संख्येने व्हिडीओ आणि क्लीप आल्या. त्यात एक व्हिडीओ गंभीर होता. त्यामध्ये ती मुलगी एका बॅगमध्ये पैसे भरतेय आणि त्यानंतर दुसरा एक व्हिडीओही तिने पाठवला. त्यामध्ये ती बॅग आमच्या घरी काम करणाऱ्या बाईला देत असल्याचे दिसते.

हा माणूस एका पोलीस आयुक्ताच्या संपर्कात

याशिवाय देवेंद्र फडणवीस यांनी एक गौप्यस्फोट देखील केला आहे. ते म्हणाले की गेल्या सरकारच्या काळात एका पोलीस आयुक्ताच्या हा माणूस संपर्कात होता. पोलिसांत माहिती घेतली असता गेल्या सरकारच्या काळात त्याच्यावरचे गुन्हे काढून घेण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. चार्जशीट मधून काही गोष्टी बाहेर येतील, पुराव्याशिवाय कोणाचेही नाव घेणार नाही. असंही यावेळी फडणवीस म्हणाले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube