पावसाचा जोर आणखी वाढणार! 12 जुलैपर्यंत अनेक जिल्ह्यांना येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट; प्रशासन अलर्ट मोडवर
जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच परिस्थिती पूर्णपणे बदलली असून गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घेतला आहे.
The intensity of the rain is set to increase further : यंदाचा मान्सून महाराष्ट्रात उशिरा दाखल झाला. त्यामुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडू शकतो, असा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. मात्र, जुलै महिन्याच्या सुरूवातीलाच परिस्थिती पूर्णपणे बदलली असून गेल्या पाच ते सहा दिवसांपासून राज्यभर पावसाने अक्षरशः धुमाकूळ घेतला आहे. अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला असून नद्या, नाले आणि धरणे तुडुंब भरू लागली आहेत. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून प्रशासनाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
विशेष म्हणजे, संपूर्ण जून महिन्यात जितका पाऊस अपेक्षित होता, त्यापैकी बहुतांश पाऊस केवळ 1 ते 6 जुलै या सहा दिवसांतच झाला आहे. यामुळे राज्यातील बहुतांश धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. अनेक धरणांतून नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घाटमाथा आणि कोकणातील अनेक भागांत भूस्खलनाचा धोकाही वाढला आहे.
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत 8 जुलै ते 12 जुलै या कालावधीत राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या काळात अनेक जिल्ह्यांसाठी येलो, ऑरेंज आणि रेड अलर्ट जारी करण्यात आले आहेत. काही भागांत ताशी वेगाने वाहणारे वारे, विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
हवामान विभागाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे, नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे, डोंगराळ आणि घाट परिसरात विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. रेड अलर्ट असलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, तर स्थानिक प्रशासनानेही बचाव पथके, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
ब्रेकिंग : मोशीत कचरा डेपोजवळील इमारत कोसळली; 15 कर्मचारी अडकल्याची भीती
8 जुलैचा अलर्ट
येलो अलर्ट : नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर घाट परिसर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नाशिक.
रेड अलर्ट : पालघर, रायगड, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसर आणि सातारा घाट परिसर.
9 जुलैचा अलर्ट
येलो अलर्ट : नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर, रत्नागिरी, रायगड, पुणे, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, नाशिक तसेच नाशिक घाट परिसर आणि कोल्हापूर घाट परिसर.
ऑरेंज अलर्ट : सातारा घाट परिसर आणि पुणे घाट परिसर.
10 जुलैचा अलर्ट
येलो अलर्ट : नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली.
11 जुलैचा अलर्ट
येलो अलर्ट : नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली.
12 जुलैचा अलर्ट
येलो अलर्ट : नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वाशीम आणि अमरावती.
एकीकडे पावसामुळे धरणे भरत असल्याने दिलासा मिळत असला, तरी दुसरीकडे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागांत पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला असून काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील सहा दिवस राज्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जात असून हवामान विभागाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.