Latur earthquake ला 30 वर्षे पूर्ण; 10 हजार लोकांचा मृत्यू, वाचा वेदनादायी कहाणी
Latur earthquake : गेल्या काही वर्षांत, जगभरात भूकंपांच्या संख्येत बरीच वाढ झाली. भूकंप (earthquake) झाल्याच्या कितीतरी बातम्या आपण पेपरात वाचत असतो. काही भूकंपात झालेली जीवितहानी कधीकधी मनाला चटका लावणारी असते. त्यातून झालेलं नुकसान भरून काढण्यासठी खूप वेळ लागतो. देशभरातील सर्वांत भयानक भूकंपापैकी, एक म्हणजे 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरमध्ये झालेला भूकंप. या भूकंपात 10 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला. या दुर्दैवी घटनेला एवढी वर्ष झाली, तरीदेखील त्याची आठवण काढली की, लोकांच्या डोळ्यात पाणी येतं. याच भूकंपाविषयी आज जाणून घेऊ.
१९९३ सालच्या सप्टेंबर महिन्यातील ३० तारखेची काळी पहाट महाराष्ट्र कधीही विसरू शकत नाही. हा गणपती विसर्जनानंतरचा दुसरा दिवस होता. महाराष्ट्र साखर झोपेत असतांना पहाटे ३ वाजून ५६ मिनिटांनी लातूर, आणि उस्मानाबाद जिल्ह्याला ६.४ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपानं दोन्ही जिल्ह्यांना मोठा हादराच दिला. भूकंपात अनेक नांदती गावे आणि कित्येक स्वप्नं घेऊन जगणारी माणसं जमिनीखाली गाडली गेली. अनेक घरांमध्ये तर दिवा लावायलाही माणूसही राहिला नव्हता. ढिगाऱ्याखाली अडकलेले मृतदेह, जखमी लोकं, नातेवाईकांचा शोध घेणारे गावकरी, मदतकार्यात गुंतलेले स्वयंसेवक, कोलमडेले संसार हे विदारक चित्र त्या दिवशी जगासमोर होतं. हाहाकार आणि आक्रोशाची ही विदारकता काळीज पिळवटून टाकणारी होती.
NCP Crisis : शरद पवार गटानं हेरलं अजितदादांचं ‘ते’ वाक्य; आता टाकणार पॉवरफुल्ल डाव?
सरकारी आकडेवारीनुसार, या विनाशकारी भूकंपात १० हजार लोक मरण पावले, तर १६ हजार लोक जखमी झाले. प्रत्यक्षात अनेकांचे मृतदेह देखील सापडले नाहीत. घरं-दारं उद्ध्वस्त झाली. क्षणार्धात सगळं संपलं. या भूकंपाचा केंद्रबिंदू सोलापूरच्या ईशान्येला ७० किलोमीटर अंतरावर होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आणि लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्याला या भूकंपाचा सर्वाधिक फटका बसला. या गावांतील ३० हजार घरं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. ही आपत्ती नव्हती तर महाप्रलय होता. या भूकंपात जितकी माणसं मेली, त्याच्या दुप्पट म्हणजे, १५ हजार ८५४ जनावरे मरण पावली.
हा भूकंप झाला तेव्हा शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. ६.४ रिश्टर स्केल ही भूकंपाची बातमी ऐकूण पवारांना परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी प्रशासनाला कामाला लावले आणि काही तासातच घटनास्थळी पोहोचले. भूकंप झाला पहाटे चार वाजता आणि पवार किल्लारीला पोहोचले ते सकाळी साडेआठ वाजता. इतकी तत्परता पवारांनी त्यावेळी दाखवली होती.
सर्व सरकारी यंत्रणा सक्रिय झाल्या. त्यांच्या मदतीला लष्कराचे जवानही आले. घरांच्या ढिगार्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढणं, मृतदेह बाहेर काढणं, जखमींना रुग्णालयात नेणं आणि लोकांना तात्पुरता निवारा देणं ही काम यंत्रणेनं तातडीनं आणि योग्यप्रकारे केली. स्वयंसेवी संस्थांनीही मदतकार्यात मोठं योगदान दिले. या काळात प्रशासनावर कसा कंट्रोल असावा, याचा प्रत्यय पवारांनी दाखवून दिला. हा असा भूकंप होता ज्याने केवळ महाराष्ट्र किंवा भारतालाच नाहीतर संपूर्ण जग हादरलं आणि हळहळलं होतं. महाराष्ट्राला या संकटातून बाहेर काढण्यासाठी जागतिक स्तरावरूनही अनेक प्रकारची मदत करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापनाही या भूकंपानंतरच झाली.
दरम्यान, भूकंपाचा हादरा बसल्यानंतर भूकंपग्रस्त परिसरात दरवर्षी ३० सप्टेंबर हा काळा दिवस म्हणून पाळला जातो. सर्व व्यवहार बंद ठेवून भूकंपात बळी गेलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात येते. या दुर्घटनेत बळी गेलेल्या निष्पाप जीवांना लेट्सअप मराठीतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.