‘सुपर सनी मंथ’ क्रीडा महोत्सवाची धूम; 17 हजार धावपटू पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉनमध्ये धावणार
“सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत तिसरी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन - रन फॉर अमृतकाल स्पर्धेला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे.
The ‘Super Sunny Month’ sports festival is a hit : युवा सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक सनी विनायक निम्हण यांच्या वाढदिवसानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने आयोजित “सुपर सनी मंथ” क्रीडा महोत्सवाअंतर्गत तिसरी पुणे ट्वीन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल स्पर्धेला यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी तब्बल 17 हजार धावपटूंनी सहभाग नोंदवला असून ही स्पर्धा 8 मार्च 2026 रोजी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हरसिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे पार पडणार आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून पुणे आणि पिंपरी चिंचवड या ट्वीन सिटींना जोडत आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. याबाबत बोलताना नगरसेवक सनी विनायक निम्हण म्हणाले की, आजच्या तरुणाईसमोर अनेक प्रकारची आव्हाने उभी आहेत. व्यसनाधीनतेपासून दूर राहून खेळ आणि व्यायामाकडे वळणे ही काळाची गरज आहे. समाजात फिटनेस आणि सकारात्मक जीवनशैलीची जाणीव निर्माण व्हावी, तसेच तरुणांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांप्रमाणे यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून मोठ्या संख्येने धावपटू स्पर्धेत सहभागी होत असल्याचे त्यांनी सांगितले. या स्पर्धेच्या माध्यमातून “टुगेदर अगेन्स्ट ड्रग्स” या नशामुक्ती अभियानासाठीही नागरिक एकत्र येणार आहेत.
ही स्पर्धा पुणे जिल्हा हौशी अॅथलेटिक संघटनेच्या मान्यतेने आयोजित करण्यात आली असून यात 21 किमी, 10 किमी, 5 किमी आणि 3 किमी अशा चार गटांमध्ये धावपटू सहभागी होणार आहेत. पहाटे 5 वाजता 21.1 किमी शर्यतीला सुरुवात होणार असून सकाळी 5.45 वाजता 10 किमी, 7.15 वाजता 5 किमी आणि 7.30 वाजता 3 किमी शर्यतीला प्रारंभ होईल.
21.1 किमी शर्यतीचा मार्ग सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हरसिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथून सुरू होऊन इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ऍस्ट्रॉनॉमी अँड ऍस्ट्रोफिजिक्स, स्पायसर अॅडवेंटिस्ट युनिव्हर्सिटी, ब्रेमेन चौक, परिहार चौक, वेस्टएंड मॉल, औंध मिलिटरी स्टेशन, विशाल नगर मेन रोड, न्यू डीपी रोड, ज्युपिटर हॉस्पिटल मार्गे लक्ष्मी माता मंदिर, ममता चौक, ताम्हाणे चौक, औंध-बाणेर लिंक रोड आणि नागरस रोड असा प्रवास करत पुन्हा वेस्टएंड मॉल आणि परिहार चौक मार्गे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे समाप्त होईल.
तर 10 किमी शर्यतीचा मार्ग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स – आयुका – स्पायसर अॅडव्हेंटिस्ट विद्यापीठ – ब्रेमेन चौक – परिहार चौक – वेस्टएंड मॉल – नागरस रोड – औंध-बाणेर लिंक रोड – ताम्हाणे चौक आणि पुन्हा विद्यापीठ स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असा असणार आहे.
या स्पर्धेत एकूण 5 लाख 55 हजार 555 रुपयांची रोख पारितोषिके देण्यात येणार असून सर्व सहभागी धावपटूंना टी-शर्ट, गुडी बॅग, पदक, ई-टायमिंग प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या मॅरेथॉन स्पर्धेचे तांत्रिक नियोजन यश रायकर यांनी केले आहे.
