संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा आजचा पहिला दिवस; अदाणी, मणिपूर प्रकरणारून विरोधक आक्रमक
Parliament Winter Session 2024 : संसदेचे चार आठवड्यांचे हिवाळी अधिवेशन आज (२५ नोव्हेंबर) पासून सुरू झालं आहे. यामध्ये अमेरिकेकडून अदाणी यांच्यावर करण्यात आलेले लाचखोरीचे आरोप ते मणिपूरमध्ये भडकलेला हिंसाचार या मुद्द्यांवर विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले जाण्याची शक्यता आहे. (Parliament ) तर, दुसरीकडे भाजपाच्या नेतृत्वात एनडीएने हरियाणानंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दमदार यश मिळवल्याने सत्ताधारी पक्षांचा आत्मविश्वास देखील उंचावलेला आहे.
अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेससह इतर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष सहभागी झाले होते. यावेळी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष या दोन्ही गटांचा मूडमध्ये गेल्या अधिवेशनाच्या तुलनेत मोठा बदल झाला आहे. लोकसभा निवडणुकीत समाधानकारक कामगिरी न झाल्याने निराश भाजपाने यावेळी महाराष्ट्रात विक्रमी विजय नोंदवला आहे. तर दुसरीकडे विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर विरोधी पक्ष पुन्हा एकजूट दाखवण्याचा प्रयत्नात आहेत.
झारखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि इंडिया आघाडीमधील सहकारी पक्षांची प्रतिष्ठा वाचली असली तरीही काँग्रेस पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत नाही. मात्र अशा परिस्थितीतही विरोधक हिवाळी अधिवेशनादरम्यान अदाणी प्रकरण आणि मणीपुरमधील हिंसाचार या मुद्द्यांवर केंद्र सराकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील, असं सूत्रांचं म्हणणं आहे.
दुसरीकडे केंद्र सरकार संसदेच्या संयुक्त समितीच्या विचाराधीन असलेले वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला मंजूरी मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसेल. या समितीच्या अध्यक्षा जगदंबिका पाल यांनी समितीचा अहवाल तयार असल्याचं म्हटलं आहे. मात्र, या अहवालाच्या विरोधात असलेले सदस्य मात्र अजून वेळ मागत आहेत, तसंच ते आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेण्याची शक्यता देखील आहे.
संयुक्त समिती स्थापन करताना या समितीला अहवाल सादर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंतचा वेळ दिला होता. मात्र, संयुक्त समितीचा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आल्यानंतर लगेच सरकारने हे वक्फ बोर्ड सुधारणा विधेयक चर्चेसाठी, तसेच मंजूर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात सूचीबद्ध केले आहे.