नामांतराला विरोध नाही पण…, आमदार संग्राम जगताप यांनी मांडली भूमिका
अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्याच्या नामांतराची मागणी जोर धरत आहे. अशा स्थितीत अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी नामांतरा आधी जिल्हा विभाजन करा, अशी मागणी केली आहे. त्यामुळे नामांतरा बरोबरच जिल्हा विभाजनाच्या प्रश्नानेही डोके वर काढले आहे.
आमदार संग्राम जगताप म्हणाले, नामांतराला आमचा कुणाचाही विरोध नसणार आहे. आमची मागणी आहे की या नामांतरा आधी जिल्हा विभाजन करा. नामांतरानंतर जिल्हा विभाजन झाल्यास नवीन ठिकाणाला काय नाव द्यायचे असा प्रश्न उद्भवला जाऊ शकतो. त्यामुळे नामांतरा ऐवजी जिल्हा विभाजन व्हायला हवे. लगेचच विभाजन व लगेचच नामांतर होणे गरजेचे आहे.
जिल्हा बाहेरील लोकांनी अहमदनगर जिल्ह्यात हस्तक्षेप करू नये, असे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले होते. यावर आमदार जगताप म्हणाले, ते त्यांचे वैयक्तिक मत आहे. अहमदनगर महापालिका, रेल्वे विभाग, डाक विभाग आदींना नामांतरा बाबत राज्य सरकारकडून पत्र आले असतील. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, संबंधित तालुक्यांतील नगरपालिका यातील सर्व सदस्यांना विचारात घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी एकत्रितपणे विचार विनिमय करून निर्णय घ्यायला हवा. त्यामुळे पहिले नामांतर होण्या ऐवजी जिल्हा विभाजन करावे. त्यानंतरच नामांतराचा विषय पुढे यायला हवा. जिल्हा विभाजन केल्यास पुन्हा नामांतराचा प्रश्न उद्भवेल. त्यादृष्टीने सरकार दरबारी आम्ही मागणी केली आहे.या संदर्भात महापालिकेने प्रस्ताव पाठविला आहे. जिल्हा विभाजनाचा अधिकार राज्य सरकारला असतो. तसे झाले नाही तर प्राप्त परिस्थिती नुसार निर्णय घेतला जाईल.
नामांतरापेक्षा जिल्हा विभाजन महत्त्वाचे आहे. ठाण्यातून पालघर वेगळा जिल्हा झाल्यावर त्या भागात विकासाला गती मिळाली. अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात पाण्याचा मोठा प्रश्न आहे. जिल्ह्यातील प्रमुख धरणे जिल्ह्याच्या उत्तर भागातच आहेत. समृद्धी महामार्ग उत्तर भागातच झाला. अहमदनगरला होणारे विमानतळ शिर्डीला झाले. जिल्ह्याच्या दक्षिण भागावर अन्याय होत आहे. जिल्हा सहकारी बँकेत अधिकचे कर्ज वाटप जिल्ह्याच्या उत्तर भागातील साखर कारखान्यांना केले जाते. त्यामुळे शेतकरी दक्षिण भागातील शेतकरी अडचणीत येत आहेत. जिल्ह्याचे विभाजन झाल्यास दक्षिण भागात मोठे धरण बांधले जायला हवे. शेतकरी समृद्ध झाला तर शहराला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.