आजपासून त्र्यंबकेश्वर जोतिर्लिंग मंदिर बंद; आठ दिवस भाविकांसाठी दर्शन बंद
नाशिक : बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. हे मंदिर पुढील आठ दिवस बंद असणार आहे. अतिप्राचीन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे संवर्धन करण्यासाठी आणि मंदिराच्या देखभालीच्या कामासाठी मंदिर बंद राहणार असल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिलीय.
येथील त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाच्या माहितीनुसार, 5 जानेवारी 2023 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत पूर्णपणे काम बंद राहणार आहे. ज्योतिर्लिंगाचे आणि मंदिराच्या संरक्षण कामांमुळं मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानं भाविकांना दर्शन घेता येणार नसल्याची माहिती मंदिर प्रशासनानं दिलीय.
मंदिर संवर्धनाचं काम भारतीय पुरातत्त्व विभागामार्फत केलं जाणार असल्याचंही मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलंय. त्यामुळं आता सर्व भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टकडून करण्यात आलंय.
त्र्यंबकेश्वर मंदिरातील अध्याय ज्योतिर्लिंगाची झीज होऊ लागल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. यावर उपाययोजना म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते आहे. तसेच शिवलिंगाच्या एका बाजूचा वज्रलेप निघत असल्याचे दिसून येत असून हा वज्रलेप लावून केवळ आठ वर्षे पूर्ण झाली आहेत. तरी देखील शिवलिंगाची झीज होत असल्याची असल्याने मंदिर प्रशासनाकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने त्रंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे संवर्धन आणि मंदिराची देखभाल दुरुस्तीसाठी काही दिवस मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
त्र्यंबकेश्वर येथील शिवलिंगाची रचना इतर स्थानांपेक्षा काहिशी वेगळी आहे. त्यामुळं या ज्योतिर्लिंगाला विशेष महत्त्व आहे. येथील शिवलिंगात ब्रह्मा, विष्णू, महेश असे तीन उंचवटे असून या उंचवट्यावर असलेला कंगोरा ज्याला स्थानिक लोक पाळ असं म्हणतात, त्या पाळावरचे कवच देखील निघू लागले आहे. या आधीच ही बाब लक्षात आली होती. त्यामुळं उपाययोजना म्हणून मंदिर बंद करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. त्यानुसार आता दि. 5 ते 12 जानेवारी 2023 पर्यंत मंदिर पूर्णपणे बंद राहणार आहे. या काळात भाविकांना मंदिरात दर्शन घेता येणार नाही, अशी माहिती मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली आहे.