‘आयएएस व्हा’ असं मी सांगणार नाही, तरुणाच्या प्रश्नावर तुकाराम मुंढेंचं रोखठोक उत्तर, भूमिका केली स्पष्ट
आयएएस अधिकारी व्हावं की यशस्वी उद्योजक? असा प्रश्न एका तरुणाने विचारला असता, मुंढे यांनी त्यावर स्पष्ट आणि मार्मिक असं उत्तर दिलं आहे.
Tukaram Mundhe’s blunt response : पिंपरी चिंचवडमध्ये आयोजित ग्लोबल मराठा बिझनेस एक्स्पोमध्ये आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी तरुणांना करिअर निवडीबाबत मोलाचा सल्ला दिला. आयएएस अधिकारी व्हावं की यशस्वी उद्योजक? असा प्रश्न एका तरुणाने विचारला असता, मुंढे यांनी त्यावर स्पष्ट आणि मार्मिक असं उत्तर दिलं आहे. करिअर निवडताना इतरांचं अनुकरण करण्याऐवजी स्वतःच कौशल्य ओळखा, समाजातील समस्या समजून घ्या आणि त्यावर उपाय शोधण्याच्या दिशेने काम करा, असा संदेश त्यांनी दिला.
करिअर निवडताना केवळ आयएएस अधिकारी होण्याच्या प्रतिष्ठेकडे किंवा उद्योजकतेच्या आकर्षणाकडे पाहू नका. आपल्यामध्ये कोणते कौशल्य आहे आणि समाजासाठी आपण कोणते मूल्य निर्माण करू शकतो, याचा विचार करणे महत्वाचे आहे, असे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. आयएएस व्हायचे की उद्योजक, हा निर्णय प्रत्येकाने स्वतःच्या आवडीनिवडी, क्षमता आणि ध्येयांनुसार घ्यावा. समाजाचा एक भाग म्हणून समाजात मूल्यवर्धन करणे आवश्यक असल्याचं देखील त्यांनी केलं.
या कार्यक्रमात बोलताना तुकाराम मुंढे यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. दुष्काळाकडे केवळ संकट म्हणून न पाहता, त्यामागील कारणे समजून घेऊन त्यावर उपाय शोधण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पुढील सहा ते सात महिन्यांत पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काय करता येईल, याचा गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन त्यांनी केले. ग्रामीण भागात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही संकल्पना प्रभावीपणे राबवण्यावरही त्यांनी भर दिला.
राज्यात हवामानाचा डबल गेम! एका बाजूला उकाडा, तर दुसरीकडे महाराष्ट्रासह 16 राज्यांत वादळी पावसाचा इशारा
दुग्ध व्यवसायातील संधींकडे लक्ष वेधताना मुंढे म्हणाले की, देशात दुधाची मागणी आणि शुद्ध दुधाची उपलब्धता यांचा विचार करता या क्षेत्रात उद्योजकतेला मोठा वाव आहे. दुग्ध व्यवसायाचा विस्तार, दुधाला योग्य दर आणि दुग्धजन्य पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगातून ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. मात्र, या क्षेत्रातील गैरप्रकार रोखण्यासाठी नियामक यंत्रणेसोबतच सर्व संबंधितांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
पशुसंवर्धन विभागातील आपल्या कामाचा अनुभव सांगताना तुकाराम मुंढे यांनी हायड्रोपॉनिक्स तंत्रज्ञानाचे महत्त्व स्पष्ट केले. कमी पाण्यात पशुआहार तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे पाणीटंचाई असलेल्या ग्रामीण भागांतही दुग्ध व्यवसायाच्या संधी निर्माण होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
या तंत्रज्ञानाच्या मदतीने पशुआहाराची गुणवत्ता सुधारण्यास आणि दुग्ध उत्पादन वाढवण्यास मदत होऊ शकते. शुद्ध दुधाला बाजारात मागणी असल्याने दुग्धजन्य पदार्थांच्या प्रक्रिया उद्योगाचाही विचार करता येईल, असे त्यांनी नमूद केले. एकूणच, तरुणांनी करिअर निवडताना केवळ पद किंवा प्रतिष्ठा यांचा विचार न करता स्वतःचे कौशल्य, समाजातील गरजा आणि उद्योजकतेच्या संधी ओळखाव्यात, हा महत्त्वपूर्ण संदेश तुकाराम मुंढे यांनी या कार्यक्रमातून दिला.