जेऊरमध्ये विजय संकल्प सभेला प्रचंड प्रतिसाद; अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी एकजुटीचा निर्धार
जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, बूथ प्रमुख,कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला.
Unity’s determination for Akshay Kardile’s victory : राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ जेऊर येथे पार पडलेली विजय संकल्प सभा उत्साह, निर्धार आणि प्रचंड जनसमर्थनाने गाजली. या सभेत जिल्ह्यातील प्रमुख नेते, पदाधिकारी, बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अक्षय कर्डिले यांना आमदार करण्याचा ठाम निर्धार व्यक्त केला. सभेत मार्गदर्शन करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठामपणे सांगितले की, “2024 च्या लोकसभा निवडणुकीत ‘आपकी बार 400 पार’ या घोषणेचा काय परिणाम झाला हे सर्वांना ठाऊक आहे.
ही निवडणूक केवळ एक राजकीय लढत नसून आपल्या प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे अक्षय कर्डिले यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणे ही सर्वांची जबाबदारी आहे. ते पुढे म्हणाले की, स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरी-पाथर्डी मतदारसंघात उभे केलेले विकासाचे भक्कम पायाभूत काम पुढे नेण्याचे कार्य आता अक्षय कर्डिले यांच्या माध्यमातून होणार आहे. वांबोरी चारी टप्पा दोनचे काम लवकर पूर्ण करण्यात येणार असून जिरायत भागातील साकळाई पाणी योजनेचे काम पुढील एक महिन्यात सुरू करण्याचा निर्धार शासनाने केला आहे.
मुळा धरणातील पाणीसाठा वाढवण्यासाठी तीन टीएमसी गाळ काढणे आणि अडीच टीएमसी अतिरिक्त पाणी निर्माण करणे हे सरकारसमोरील मोठे उद्दिष्ट आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. “2029 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यात एक खासदार आणि विधानसभेत चार आमदार वाढणार आहेत. त्यामुळे विरोधकांमध्ये आतापासूनच धास्ती निर्माण झाली आहे.
पुढील दोन वर्षांत जिल्ह्यातील सुमारे 30 हजार युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ठोस नियोजन सुरू आहे,” असे सांगत त्यांनी विकासाच्या अजेंड्याला प्राधान्य दिले. या सभेला प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, आमदार मोनिकाताई राजळे, आमदार विक्रमसिंह पाचपुते, आमदार प्रसाद लाड, महामंत्री विजय चौधरी, रवींद्र अनासपुरे, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, केशव उपाध्ये, जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, अनिल मोहिते आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली. विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले हे 24 तास जनतेत राहून काम करणारे नेतृत्व होते.
मतदारसंघ फेररचना विधेयक राष्ट्रविरोधी; राहुल गांधींचा लोकसभेत सत्ताधाऱ्यांवर थेट वार
त्यांच्या अचानक जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी अक्षय कर्डिले यांना आमदार करणे ही काळाची गरज आहे. त्यांनी संघर्षातून स्वतःचे स्थान निर्माण केले आणि जनतेचे प्रश्न सोडवले. त्यांच्या कार्याची खरी परतफेड म्हणजे अक्षय कर्डिले यांचा विजय. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसारखे महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. शिवाजीराव कर्डिले यांचे योगदान सर्वांनाच माहीत असून त्यांच्या अपूर्ण विकासकामांना गती देण्यासाठी अक्षय कर्डिले यांना निवडून देणे ही प्रत्येक कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. यावेळी आमदार मोनिकाताई राजळे यांनी प्रभावी प्रास्ताविक करत कार्यकर्त्यांना प्रेरित केले. त्यांनी सांगितले की, “ही निवडणूक जनतेने हाती घेतली आहे.
गावागावातील कार्यकर्ते एकदिलाने काम करत असून अक्षय कर्डिले यांच्या विजयासाठी सर्वांनी एकजूट दाखवली आहे. उमेदवार अक्षय कर्डिले यांनी आभार प्रदर्शन करताना भावनिक साद घालत सांगितले की, “माझ्या वडिलांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला मतरूपी आशीर्वाद द्या. मी विकासकामांच्या माध्यमातून तुमचा विश्वास सार्थ ठरवेन. सभेदरम्यान बूथ प्रमुखांनी गावागावात जाऊन केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. तसेच अक्षय कर्डिले यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचा संकल्प सर्वांनी केला.
एकूणच, जेऊर येथील या विजय संकल्प सभेने भाजप महायुतीच्या प्रचाराला नवे बळ मिळाले असून अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीभोवती जनतेचा विश्वास आणि समर्थन अधिक दृढ होत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून आले.