मी फरार नाही, कायदा पाळणारा माणूस आहे”; अटकेनंतर विकास लवांडेंची संतप्त प्रतिक्रिया, पोलिसांवर गंभीर आरोप
बिबवेवाडी पोलीस ठाण्यात नोंद असलेला गौतम कांबळे यांच्या नावावरील गुन्हा चुकून विकास लवांडे यांच्या नावावर दाखवण्यात आल्याचं उघड झालं.
Vikas Lawande makes serious allegations against the police : पुण्यातील वाघोली पोलीस ठाण्याच्या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते विकास लवांडे यांच्या नावावर नसलेला गुन्हा दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान ही बाब उघडकीस आल्यानंतर पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
काही दिवसांपूर्वी वाघोली पोलिसांनी विकास लवांडे यांना ताब्यात घेतलं होतं. त्यांनतर अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी न्यायालयात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालात मोठी चूक झाल्याचं समोर आलं. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात नोंद असलेला गौतम कांबळे यांच्या नावावरील गुन्हा चुकून विकास लवांडे यांच्या नावावर दाखवण्यात आल्याचं उघड झालं. विशेष म्हणजे, ज्या गुन्ह्याच्या आधारे जामिनाला विरोध करण्यात आला, त्या प्रकरणाशी लवांडेंचा कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
याप्रकरणी पोलिसांनी नजरचुकीमुळे ही चूक झाली, असा खुलासा केला आहे. मात्र, या चुकीमुळे न्यायालयाने लवांडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज राखून ठेवला. त्यामुळे राजकीय वर्तुळातून संताप व्यक्त केला जात आहे. विकास लवांडे यांच्याविरोधात 2017 मधील गुन्हा क्रमांक 32 दाखल होता. मात्र, त्या प्रकरणातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. तरी देखील पोलिसांनी गुन्हा क्रमांक 33(2017) चा उल्लेख करत त्यांना आरोपी दाखवल्याने संपूर्ण प्रकरण अधिकच गंभीर बनल आहे. संबंधित गुन्ह्यात लवांडे आरोपी नसल्याचं समोर आल्यानंतर पोलीस प्रशासनावर टीकेची झोड उठली आहे.
मेलोडी चॉकलेटप्रमाणे पेट्रोल-डिझेलचे दर वाढतायत; रोहित पवारांचा केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल
दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विकास लवांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पुणे पोलिसांची अवस्था चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखी झाली आहे. माझ्यावर जीवघेणा हल्ला करणारे आरोपी अजूनही मोकाट आहेत, मात्र कोणताही ठोस पुरावा नसताना मला अटक करण्यासाठी पोलीस रात्री घरी आले , असा आरोप त्यांनी केला .
मी फरार नाही, ना कायद्यापासून पाळणारा माणूस आहे. पोलिसांनी मला फोन केला असता तर मी स्वतः हजर झालो असतो. कुटुंबीयांनी घाबरवण्याचा प्रयत्न का करण्यात आला? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच मी कायदा पाळणारा माणूस आहे. सत्यासाठी लढत राहणार असून, शासनाने मला अटक करायची असेल तर जरूर करावी. मी पोलिसांना सहकार्य करेन, असं देखील लवांडे यांनी स्पष्ट केलं.