पार्थ पवारांचा प्रभाव की नव्या नेतृत्वाला संधी? पुणे विधान परिषदेसाठी विक्रम काकडेंची निवड चर्चेचा विषय
सर्व चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केली.
Vikram Kakade nominated for Pune Legislative Council : स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा बहुचर्चित तिढा अखेर सुटला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या बैठका, चर्चासत्रे आणि राजकीय वाटाघाटींनंतर 17 जागांसाठी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतिम सहमती झाली आहे. या फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस 2 जागांवर निवडणूक लढवणार आहे.
जागावाटपात पुणे आणि रायगड हे दोन महत्त्वाचे मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले आहेत. त्यामुळे या दोन्ही जागांवर उमेदवारीसाठी पक्षांतर्गत मोठी स्पर्धा निर्माण झाली होती. विशेषतः पुणे मतदारसंघासाठी अनेक दिग्गज नेत्यांनी दावा केल्याने राष्ट्रवादीसमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हान उभे राहिले होते. याच पार्श्वभूमीवर रविवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. रात्री साडेआठ वाजता सुरू झालेली ही बैठक जवळपास पाच तास चालली. पक्षाचे वरिष्ठ नेते, स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्यात सविस्तर चर्चा झाली. बैठकीला माजी खासदार संजय काकडे यांची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली.
पुणे विधान परिषद मतदारसंघासाठी माजी आमदार दिलीप मोहिते, सुनील टिंगरे, रमेश थोरात, विलास लांडे यांच्यासह अजित गव्हाणे, रणजित शिवतारे आणि दीपक मानकर यांची नावे आघाडीवर मानली जात होती. अनेक इच्छुकांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आपला प्रभाव आणि पक्षनिष्ठेचा आधार घेत उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले होते. त्यामुळे अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने झुकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, सर्व चर्चांना पूर्णविराम देत राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर विक्रम काकडे यांना उमेदवारी जाहीर केली. या निर्णयामुळे अनेक इच्छुकांना धक्का बसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
विक्रम काकडे यांची ओळख खासदार पार्थ पवार यांचे निकटवर्तीय म्हणून आहे. त्याचबरोबर ते भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांची निवड ही केवळ उमेदवारी नसून भविष्यातील राजकीय समीकरणांचा भाग असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील राजकारणात नव्या पिढीला संधी देण्याचा संदेश या निर्णयातून देण्यात आल्याची चर्चा आहे.
विधान परिषदेत परिचारकांना झटका; सोलापूरमधून भाजपकडून राजा राऊतांच्या नावावर शिक्कामोर्तब
राजकीय विश्लेषकांच्या मते, राष्ट्रवादीने विक्रम काकडेंना उमेदवारी देत एकाच वेळी अनेक समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संपर्क, काकडे कुटुंबाचा राजकीय प्रभाव आणि खासदार पार्थ पवार यांचा वाढता हस्तक्षेप या सर्व बाबी या निर्णयामागे असल्याचे मानले जात आहे. दुसरीकडे, महायुतीतील जागावाटपात शिवसेनेला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याची चर्चा सुरू आहे. सात जागांची मागणी करणाऱ्या शिंदे गटाला अखेर चार जागांवर समाधान मानावे लागले. तर भाजपने सर्वाधिक 11 जागा आपल्या वाट्याला घेत महायुतीतील आपले वर्चस्व पुन्हा अधोरेखित केले आहे.
दरम्यान, विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून उमेदवारांच्या नावांवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात येत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने बहुतांश जागांवरील उमेदवार निश्चित केले असले तरी काही ठिकाणी नाराज इच्छुक बंडखोरीचा मार्ग स्वीकारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यामुळे उमेदवारी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता असून, स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांच्या विधान परिषद निवडणुकीत यंदा चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुण्यात विक्रम काकडेंच्या उमेदवारीमुळे निर्माण झालेली चर्चा आणि नाराज इच्छुकांची पुढील भूमिका याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.