…आम्ही मूग गिळून बसलेलो नाही; अजित पवारांनी ठणकावून सांगितलं
मुंबई : अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही मूग गिळून बसलेलो नसल्याचं राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ठणकावून सांगितलंय. आज राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर पवार पत्रकार परिषद बोलत होते.
पवार म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेने पुढे जात असून आमच्या पक्षात सर्व धर्माला न्याय देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे जो काही बाऊ करतात त्याला काडीचा आधार नसल्याचं त्यांनी म्हटंलंय.
सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात तारीख पे तारीख मिळत आहे. आपण न्यायालयाला विचारु शकतो का? त्यांना तो अधिकार आहे तो ते वापरत आहेत. मात्र गेले सहा महिने झाले तारीखच मिळत आहे, असेही अजित पवार म्हणाले.
तसेच सत्ताधारी पक्षाच्या पोटात दुखत असेल म्हणून ते अपप्रचार करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहे त्याच्याशी आमचा दुरान्वये संबंध नाही आम्ही आमच्या भूमिकेनेच पुढे जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
कुणालातरी पुढे करुन गुन्हा दाखल करायला लावणे ही महाराष्ट्राची परंपरा नाही. आमच्या काळात विरोधक होते पण असा प्रयत्न केलेला नाही. त्यामुळे असा प्रयत्न कुणी केला तर जनता हे बारकाईने बघत असते त्यामुळे आम्ही हे सहन करणार नसल्याचं त्यांनी म्हंटलंय.
त्याचप्रमाणे जाणीवपूर्वक गोवण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न राजकीय विरोधक आहेत. म्हणून त्यांना संपवण्याचा प्रयत्न कोण करु पहात असेल तर हे महाराष्ट्र कदापीही सहन करणार नाही आणि राष्ट्रवादी काँग्रेसही खपवून घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय.
दरम्यान, आज राज्यातील विविध प्रश्नांवर बैठकीत चर्चा झाली असून रणनीती ठरवण्यात आली असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.