राज्याला आणखी हुडहुडी भरणार, ‘या’ जिल्ह्यांत थंडीचा कडाका वाढणार
मुंबई : राज्यातील काही भागात थंडीमुळं संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालेलं असताना आता तापमानाचा पारा पुन्हा घसरण्याची शक्यता आहे. राज्यभरात येत्या 48 तासांत पुणे, अहमदनगर, नंदुरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यातील काही भागात हुडहुडी भरणार आहे. थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपासून कडाक्याच्या थंडीनं उत्तर महाराष्ट्र सध्या चांगलाच गारठलाय. उत्तरेकडून वाहणाऱ्या शीत वाऱ्यांमुळं मोठ्या प्रमाणावर कडाक्याची थंडी पडलीय. सध्या उत्तर भारत चांगलाच गारठलाय. देशाची राजधानी दिल्लीत थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आलाय. किमान तापमान 5 अंशांवर गेलंय असून दृश्यमान्यता 50 मीटरपेक्षाही कमी झालीय. पुढील दोन दिवस तापमानात घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय.
मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, विदर्भाच्या काही भागात थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय. विदर्भातील काही जिल्ह्यात थंडीची लाट येण्याची शक्यता आहे तर पुढील आठवड्यात मुंबईतील तापमानातही मोठी घट होण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील तापमानात घट होण्याची शक्यता आहे. 13 आणि 14 जानेवारी दरम्यान मुंबईतील तापमानातही घट होण्याची शक्यता वर्तवली आहे.
वेण्णालेकमधील तापमान घसरलं असून वेण्णालेक 6 अंश तर महाबळेश्वर 9 अंशावर गेलंय. तर साताऱ्यातील तापमान 11 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय. निफाडमध्ये पारा 5 तर नाशिकमध्ये 8 अंशांपर्यंत खाली घसरलाय. परभणी जिल्ह्यात मागच्या चार दिवसांपासून थंडीची लाट कायम असून तापमान हे अत्यंत कमी झालंय. आजही जिल्ह्याचे तापमान 6.4 अंश असून सर्वत्र गारठा पसरला आहे. धुळे जिल्ह्यातील तापमान पाच अंश सेल्सिअसवर आलंय. त्यामुळं दिवसभर वातावरणात थंडावा पसरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय.