फडणवीसांनी उल्लेख केलेला अनिल जयसिंघानी आहे तरी कोण?
मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सध्या एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. एका डिझायनरने आपल्याला ब्लॅकमेल केल्याची तक्रार त्यांनी केली. याप्रकरणी आरोपी महिला अनिक्षा जयसिंघानी यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे अनिल जयसिंघानी होय. याच अनिल जयसिंघानी याचा उल्लेख राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील केला आहे. त्यानंतर सध्या अनिल जयसिंघानी ही व्यक्ती आहे तरी कोण ? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. त्यामुळे याविषयी आज आपण जाणून घेऊ.
जाणून घेऊ कोण आहे अनिल जयसिंघानी?
अनिल जयसिंघानी हा उल्हासनगर येथील क्रिकेट बुकी असून त्याच्यावर पाच राज्यांमध्ये एक दोन नव्हे तर तब्बल सात गुन्हे दाखल असून तो सुमारे आठ वर्षांपासून पोलिसांना चुकवत आहे. त्याला सट्टेबाजीच्या गुन्ह्यात आजवर तीनवेळा पकडण्यात आले आहे. विशेष म्हणजे 2015 मध्ये, ईडीच्या गुजरात युनिटने या सट्टेबाजाच्या दोन घरांवर धाडी टाकल्या आणि मनी लाँडरिंग कायद्यांतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मात्र अनिल जयसिंघानी हा आपली प्रकृती अस्वास्थ्य असल्याचे कारण देत तो फरार झाला आणि आठ महिन्यांनंतर मुंबई उच्च न्यायालयात ट्रान्झिट जामिनासाठी अर्ज केला. 2016 मध्ये त्याच्याविरोधात मुंबईमधील आझाद मैदान आणि साकीनाका या दोन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तब्बल तीन वर्षांपासून तो पोलिसांना चुकवत होता. काही केल्या तो पोलिसांना सापडला नाही, तेव्हा उच्च न्यायालयाने त्याला गेल्या वर्षी गुन्हेगार घोषित केले होते.
क्रिकेट बुकी असलेला अनिल जयसिंघानी सुमारे आठ वर्षांपासून फरार आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा युनिटच्या (एसीएसयू) रडारवर तो सध्या आहेत. पोलिसांसोबतच ईडीचे अधिकारी मुंबई, ठाणे, गोवा, आसाम आणि मध्य प्रदेशात जयसिंघानीचा शोध घेत आहेत. अनेकांनी असे सांगितले की, ‘जयसिंघानी लोकांवर खोटे गुन्हे दाखल करून पैसे उकळतो.
फरार अनिल जयसिंघानीला शोधण्यासाठी 10 पोलिस पथके तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणात महाराष्ट्र व गुजरात पोलीस आधीच सतर्क आहेत. फरार आरोपींचा शोध लागताच पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात येईल. सप्टेंबर 2018 मध्ये आझाद मैदान पोलिसांनी जयसिंघानी यांचे उल्हासनगर येथील घर सील केले.