Irshalwadi Landslide : दरड का कोसळली? वाचा तज्ज्ञांचे प्राथमिक विश्लेषण
रायगड : खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावावर दरड कोसळल्याच्या घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 80 हून अधिक जणांना सुखरुपरित्या बाहेर काढण्यात यश आलं आहे. सर्व अडथळ्यांवर मात करण्याचा प्रयत्न करत प्रशासन पूर्ण क्षमतेने मदत आणि बचाव कार्य करीत आहेत. याशिवाय एनडीआरएफचे 60 जवान, प्रशिक्षित ट्रेकर्स सुद्धा तैनात आहेत. हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर तैनात आहेत. तथापि खराब हवामानामुळे उड्डाण घेता येत नाही. तात्पुरते हेलिपॅड उभारण्यात आले आहेत. सिडकोच्या माध्यमातून 500 कर्मचारी पाठविण्यात आले आहेत. वैद्यकीय पथके घटनास्थळी तैनात आहेत, अशी सविस्तर माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. (Why did the landslide collapse in Raigad-khalapur-Irshalwadi Read the expert’s preliminary analysis)
दरम्यान, साधारण 50 ते 60 घरं असलेल्या या गावात अंदाजे 250 लोकं राहत असल्याची माहिती आहे. यात अजून साधारण 100 ते 125 लोकं अडकले असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र मागच्या काही वर्षांमधील ही तिसरी भयावह दुर्घटना घडली आहे. यापूर्वी 2014 साली माळीण, 2021 साली तळीये आणि आता इर्शाळवाडीमध्ये अशा प्रकारची घटना घडली आहे. मात्र अशा घटना सातत्याने का घडतात? यामागील प्राथमिक कारण काय असतात? असा प्रश्न विचारला जात आहे. याच प्रश्नाच प्राथमिक विश्लेषण सतर्क या महाराष्ट्रातील तीव्र हवामानाच्या घटनांच्या पूर्वसूचना देणाऱ्या संस्थेनं केलं आहे.
इर्शाळवाडीने जाग्या केल्या माळीण-तळीयेच्या दरड कोसळल्याच्या भयावह घटनांच्या आठवणी
दरड का कोसळली?
२० जुलै २०२३ इर्शाळवाडी, ता. कर्जत, जि. रायगड घटनास्थळाच्या जवळील खालापूर आणि कर्जत या दोन्ही ठिकाणच्या पर्जन्यमापकांवर 72 तासांत किमान 600 मिमी पावसाची नोंद झाली आहे. डोंगर उतारावर असलेल्या गावाच्या वरील बाजूस असणारी झाडांची गर्दी तेथील मातीची खोली दर्शवते. हाती आलेल्या दृश्यांवरून ही दरड ‘मड फ्लो’ प्रकारची दिसत आहे. कमी कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे मातीची पाणी धारण करण्याची क्षमता संपते. त्या ठिकाणी झालेला चिखल उतारावरून घसरून येतो, असं सतर्कने सांगितलं आहे.
#SatarkAlert #Landslide #Irshalwadi #Raigad
२० जुलै २०२३#इर्शाळवाडी दरड का कोसळली?#सतर्क चे प्राथमिक विश्लेषण. @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks @5Ndrf pic.twitter.com/61zxHRFjrc— satark (@satarkindia) July 20, 2023
मड फ्लो म्हणजे काय?
काही तासांमध्ये 300 ते 500 मिमी पाऊस एखाद्या विशिष्ट भागात पडला तर तिथल्या भूरचनेमुळे तिथं दरड कोसळण्याच्या घटना घडतात. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जायला वेळ मिळत नाही, परिणामी हे पाणी खालीपर्यंत मुरत जात आणि माती असलेल्या भागात मोठ्या प्रमाणात चिखल तयार होतो. मातीला धरून ठेवायला आधार राहत नाही. यामुळेच हा चिखल खाली येतो. या प्रकाराला मड फ्लो असं म्हणतात.
इर्शाळवाडीत सध्याची परिस्थिती काय? फडणवीसांनी दिली विधानसभेत क्षणा-क्षणाची अपडेट
सतर्क काय आहे?
दरडी कोसळण्याच्या घटनांची किमान 24 ते 48 तास आधी पूर्वकल्पना देऊ शकणारी ‘सतर्क’ यंत्रणा पुण्यातील ‘सेंटर फॉर सिटिझन सायन्स’ने विकसित केली आहे. मागील जवळपास 9 ते 10 वर्षांपासून दरडी कोसळण्याचा इशारा देण्याचं काम ही संस्था करत आहे. मागच्या पडलेल्या पावसाची अद्यावत माहिती, पुढच्या किमान 6 दिवसांचा पावसाचा अंदाज आणि दरडप्रवण भागांमधील नागरिकांकडून मिळणारी माहिती या आधारे ‘सतर्क’ राज्यातील नागरिक, शासन आणि प्रशासनाला दरडी बाबत सतर्क करण्याचं काम करते. फेसबुक, ट्विटरवरून देखील याबाबत अपडेट्स देत असते.