शरद पवारांना मोठा धक्का; माजी आमदार अजित पवारांच्या पक्षात करणार प्रवेश

Ajit Pawar : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लवकरच कार्यक्रम जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (MVA) जोरदार तयारी देखील सुरु झाली आहे. राजकीय पक्षांकडून मतांची बेरीज – वजाबाकी करण्याचे काम सुरु आहे. यातच शरद पवार (Sharad Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला (NCPSP) मोठा धक्का बसला आहे. वर्ध्याचे माजी आमदार राजू तिमांडे (Raju Timande) यांनी पक्षाची साथ सोडली आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांपूर्वी वर्ध्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे.
तर दुसरीकडे शरद पवारांची साथ सोडल्यानंतर माजी आमदार राजू तिमांडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) गुरुवारी प्रवेश करणार आहे. राजू तिमांडे हिंगणघाटच्या निखाडे मंगल कार्यालयात अनेक कार्यकर्त्यांसह गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.
विधानसभा निवडणुकीत शरद पवार यांनी उमेदवारी दिली नसल्याने माजी आमदार नाराज झाले होते. शरद पवार यांनी उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. तर आता त्यांनी शरद पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यानच राजू तिमांडे आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश करणार आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी माजी आमदार राजू तिमांडे यांनी शरद पवारांची साथ सोडल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. माजी आमदार राजू तिमांडे आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याने याचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित पवार गटाला किती फायदा होणार याबाबत वर्ध्याच्या राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.