उपमुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्ह्यात महिलेची विवस्त्र धिंड, मंदिर प्रवेशाचा वाद; तिघांना अटक

ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. मंदिर प्रवेशाच्या वादातून महिलेला मारहाण करत, तिचे कपडे फाडून तिची नग्न धिंड काढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

News Photo   2026 05 16T150358.448

ठाण्याच्या उल्हासनगरमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. (Thane) एका महिलेला मारहाण करून तिला विवस्त्र करत केस कापून, तिला चपलांचा हार घालून तिची धिंड काढण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मंदिरात प्रवेश करण्याच्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आलं आहे.

ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला आणि आरोपी हे दोघेही वाघरी समुदायातील असून ते फुगे विकण्याचे काम करतात. या दोन्ही बाजूंनी एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. आरोपींनी (जे महिलेचे नातेवाईक आहेत) असा आरोप केला आहे की, तिने त्यांच्या देवतेचा अपमान केला होता, त्यामुळे त्यांनी तिला मंदिरात प्रवेश न करण्याची ताकीद दिली होती.

भूसंपादन घोटाळा! बीडचे माजी जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

उल्हासनगर सेंट्रल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर आवताडे यांनी सांगितले की, ही घटना गुरुवारी उल्हासनगरमधील विठ्ठलवाडी परिसरात घडली. याप्रकरणी दोन आरोपींना शुक्रवारी तर एकाला शनिवारी अटक करण्यात आली. नातेवाईकांचा असा आरोप आहे की तिने त्यांच्या देवतेबद्दल अपमानास्पद वक्तव्य केले होते. आम्ही या आरोपांची पडताळणी करत आहोत, असं ते म्हणाले.

या दोन्ही पक्षांमध्ये पूर्वीपासून वाद सुरू असून आरोपींनी यापूर्वीही महिलेविरुद्ध एफआयआर (FIR) नोंदवला होता, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणात, महिलेला मारहाण करताना दिसलेल्या तीन जणांना आम्ही अटक केली असून इतर चार जणांचा शोध सुरू आहे. या घटनेबाबत अनेक अफवा पसरत असल्याने, सत्य परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहोत आणि घटनास्थळी उपस्थित असलेल्यांचे जबाब नोंदवणार आहोत, असंही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ११८ (२) (धोकादायक हत्यारांनी किंवा साधनांनी दुखापत करणे), ११५ (२) (स्वेच्छेने दुखापत केल्याबद्दलची शिक्षा), ३५१ (२)(३) (गुन्हेगारी धमकी बद्दलची शिक्षा), ३५२ (शांतता भंग करण्याच्या उद्देशाने जाणूनबुजून केलेला अपमान) आणि १८९ (बेकायदेशीर जमाव) अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.

follow us