विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणं चुकीचं, अतुल लोंढे यांची टीका

विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणं चुकीचं, अतुल लोंढे यांची टीका

मुंबई : विशेष पोलीस आयुक्त नियुक्त करणे चुकीचे आहे, अशी विशेष नेमणुक करून देवेंद्र फडणवीस हे स्वतःची समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्न करत असल्याचा असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला आहे.

ते म्हणाले, मुंबई पोलीस दलात आयुक्त हेच सर्वोच्च पद असताना विशेष पोलीस आयुक्त नेमून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली स्वतःची वेगळी यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न चालवला आहे.

पाच वर्षे राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद भूषवणे रुचले नाही. सत्ता स्थापन होताच त्यांनी लगेच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा दर्जा बरोबर करण्यासाठी दोन वेगळ्या वॉर रुम काढल्या. आता शिस्तीचे खाते असलेल्या पोलिस विभागाचे एक प्रकारे विभाजन करण्याचे काम सुरु केल्याचा आरोपही त्यांनी केला.

मुंबईचे पोलीस आयुक्त बदलता येत नाहीत किंवा काही अडचणी असतील म्हणून विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करून देवेन भारती यांची त्यावर नेमणूक करण्यात आली आहे. या नेमणुकीमुळे पोलीस आयुक्त मुख्यमंत्र्यांचा तर विशेष पोलीस आयुक्त उपमुख्यमंत्र्यांचा असा संदेश गेल्याचंही त्यांनी म्हटलंय.

आपल्या राजकीय महत्वाकांक्षेसाठी प्रशासनाची अशी मोडतोड केली आहे. असेच असेल तर आता प्रत्येक जिल्ह्यालाही विशेष जिल्हाधिकारी, विशेष जिल्हा पोलीस अधिक्षक, विशेष तहसिलदार, विशेष नायब तहसिलदार अशी वरपासून खालीपर्यंत विशेष पदांची निर्मिती करून दोन सत्ता केंद्रे तयार करा, एक शिंदे गट आणि दुसरे भाजपाला असे वाटून घ्या व प्रशासकीय यंत्रणेचा बट्टयाबोळ करा खोचक सल्ला लोंढे यांनी दिला.

दरम्यान, शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रशासकीय स्तरावर कोणतेही काम होत नसून हे स्थगिती सरकार झाले आहे. समांतर यंत्रणा उभी करून महाराष्ट्राचा बट्याबोळ करण्याचे काम केले जात आहे. हे आम्हाला मान्य नाही व योग्यही नाही, असेही लोंढे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube