Video : नुकताच कायमस्वरुपी नोकरीत, पुढील वर्षी लग्न… : दाम्पत्याच्या मारहाणीत गमवाला जीव
मुंबई : महिलेला धक्का लागल्याने झालेल्या मारहाणीत तरुणाला रेल्वे खाली जीव गमवावा लागल्याचा धक्कादायक आणि चीड आणणारी घटना नुकतीच घडली. त्यानंतर आता घटनेचा व्हिडीओही समोर आला आहे. यानंतर संबंधित तरुणाला मारहाण करणाऱ्या दाम्पत्याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. तसेच बघ्यांची भूमिका घेणाऱ्या प्रवाशांबद्दलही चीड व्यक्त केली जात आहे. (A video of a shocking and disturbing incident of a young man losing his life under the railway in the beating of a woman)
कोण होता प्रवासी?
दिनेश राठोड, हा 26 वर्षीय तरुण. मुळचा वाशिमचा तर सध्या लहान भाऊ आणि बहिणीसोबत घणसोलीला राहत होता. मुंबईत दिनेश बेस्टमध्ये आधी कंत्राटी आणि आता कायमस्वरुपी कंडक्टर म्हणून कार्यरत होता. धारावी डेपोमध्ये त्याची ड्यूटी होती. 13 ऑगस्टच्या रात्री तो ड्यूटी संपवून सायन स्थानकावर उभा होता.
काय आहे व्हिडीओमध्ये?
घटनास्थळावरील समोर आलेल्या सीसीटीव्ह फुटेजनुसार, दिनेशचा रेल्वे स्थानकावरील गर्दीत शितल माने नावाच्या महिलेला धक्का लागला. यानंतर शितल यांनी दिनेशला हातातील छत्रीने मारायला सुरूवात केली. तेवढ्यातच शितल यांचा पती अविनाश माने याने देखील दिनेशला जोरात कानाखाली लगावली. यामुळे दिनेश मागच्या बाजूला रेल्वे ट्रॅकवर पडला. तो खाली पडल्यानंतर पुन्हा रेल्वे प्लॅटफॉर्मवर चढण्याचा प्रयत्न करत असतानाही शितल आणि अविनाश हे दाम्पत्य दिनेशला मारतच राहिले. त्याचवेळी मागून येत असलेल्या लोकलने दिनेशला उडविले.
यात दिनेश गंभीर जखमी झाला आणि शासकीय रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. त्याचवेळी सीसीटीव्ही फुटेजनुसार, प्लॅटफॉर्मवरील सहप्रवाशांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती, सर्वजण केवळ मूक दर्शक बनले होते, असे दिसून येत आहे. त्यातील कोणीच दाम्पत्याला थांबवून दिनेशला पकडून प्लॅटफॉर्मवर मागे खेचण्याऐवजी फक्त पाहत उभे राहिले, असे दिसून येते. दरम्यान, अविनाश आणि शितल माने या दाम्पत्याला 15 ऑगस्ट रोजी जीआरपीच्या गुन्हे शाखेने अटक केली असून सध्या ते न्यायालयीन कोठडीत आहेत.
नुकताच कायमस्वरुपी नोकरीत… पुढील वर्षी लग्न…
टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, नुकतेच बेस्टने दिनेशला कायमस्वरूपी सेवेत घेतले होते. त्यानंतर त्याचे कुटुंब त्याच्या लग्नासाठी मुलगी देखील शोधत होते. पुढील वर्षी त्याने लग्न करावे अशी कुटुंबियांची इच्छा होती. नोकरीत कायम झाल्यानंतर त्याने एक कार देखील बुक केली होती, मात्र ही सर्वच स्वप्न आता अधुरी राहिले असून, रेल्वे अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे.