कर्करोगाशी झुंज अपयशी, आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

  • Written By: Published:
कर्करोगाशी झुंज अपयशी, आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन

पुणेः भाजपचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 59 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आहे. ते तीन टर्म आमदार राहिले आहेत. 2014 व 2019 मध्ये चिंचवड मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. तसेच महानगरपालिकेचे महापौरपदही त्यांनी भूषविले आहे.

काही दिवसांपूर्वी दुर्धर अशा आजारावर त्यांनी मात केली अस बोलले जात होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणादेखील होत होती. पण दिवाळीनंतर त्यांना पुन्हा प्रकृतीच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले आहे. आज दुपारी तीन ते सहा या वेळेत पार्थिव अत्यंदर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी सात वाजता पिंपरी गुरव येथे अंत्यविधी होणार असल्याची माहिती निकटवर्तीयांनी दिली.

मे महिन्यात झालेल्या राज्यसभा आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या वेळी लक्ष्मण जगताप यांचे एक मत भाजपासाठी बहुमोल ठरले होते. आजारी असतानाही मुंबईला रुग्णवाहिकेतून येऊन त्यांनी मतदानाचा हक्क बजावला होता. गेल्या आठवड्यात भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाले होते. गेल्या काही दिवसांत भाजपच्या लढवय्या दोन आमदारांचे दुर्धर आजाराने निधन झाले आहे.

महापालिकेत राजकीय दबदबा
जगताप यांची राजकीय कारकीर्दही काँग्रेसमधून सुरू झाली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेत ते चार वेळा नगरसेवक राहिले आहेत. स्थायी समिती अध्यक्ष, महापौर अशी पदे भूषविली आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्षपद भूषविले होते. पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदरासंघातून विधानपरिषदेवर २००४ मध्ये निवडून गेले होते. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर २००९, व त्यानंतर २०१४ व २०१९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारीवर ते आमदार झाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube