एक पोलीस अधिकारी तोडणार भाजप-शिवसेना युती? शिंदेंचे काम न करण्याचा ठराव मंजूर

एक पोलीस अधिकारी तोडणार भाजप-शिवसेना युती? शिंदेंचे काम न करण्याचा ठराव मंजूर

कल्याण : एका पोलीस अधिकाऱ्यामुळे ठाणे-कल्याणमध्ये भाजप आणि शिवसेना युतीमध्ये सध्या ठिणगी पडली आहे. या पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेसोबत आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत काम न करण्याचा ठराव भाजपने कल्याण लोकसभा निवडणूक आढावा बैठकीत केला. कल्याण पूर्व येथे तिसाई देवी हॉलमध्ये ही आढावा बैठक संपन्न झाली. दरम्यान, आतापर्यंत फक्त चर्चा होणे आणि ठराव होण्यापर्यंत विषय जाणे ही गोष्ट गंभीर आहे, असे मत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केले. (BJP’s resolution not to work with Shiv Sena in Kalyan until Police Inspector Shekhar Bagade is transferred)

काय घडलं बैठकीत?

कल्याण लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नुकतीच भाजपची आढावा बैठक पार पडली, यावेळी मंत्री चव्हाण यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या 9 वर्षे पूर्तीनिमित्ताने अभिनंदन ठराव मांडला. याला उपस्थित शेकडो पदाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. त्यानंतर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले यांनी जोपर्यंत पोलीस निरीक्षक शेखर बगाडे यांची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेचे काम न करणे, कार्यक्रमात सहभागी न होणे असा प्रस्ताव मांडला. या उपस्थित सर्वानुमते अनुमोदन देण्यात आले आणि ठराव पारित करण्यात आला. मात्र यामुळे आता एक पोलीस अधिकारी शिवसेना-भाजप युती तोडणार का असा सवाल विचारला जात आहे.

भाजप-शिवसेना युतीत मिठाचा खडा टाकणारा पोलीस अधिकारी आहे तरी कोण?

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बगाडे हे मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहेत. शेखर बागडे हे सत्ताधारी पक्षातील एका वरिष्ठ नेत्याच्या जवळचे असल्याची चर्चा कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली, कल्याण या परिसरात आहे. मुंब्रा येथून बदली होऊन आल्यानंतर ते एकाच पक्षातील नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना जुमानत असल्याने भाजप आणि मनसे या पक्षाचे पदाधिकारी नाराज असल्याचं बोललं जातं.

अशात मंत्री रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्ती आणि डोंबिवली पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांच्याविरोधात एका महिलेने मानपाडा पोलिस स्थानकात विनयभंगाची तक्रार दाखल केली. या दाखल तक्रारीवरुन मानपाडा पोलिसांनी नंजोशी यांच्यावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला. मात्र हा गुन्हा दाखल होताच भाजपच्या वतीने मानपाडा पोलिस ठाण्यावर भव्य मोर्चा काढत शेखर बागडे यांच्या बदलीची मागणी करण्यात आली.

याप्रकरणी कोणतीही सखोल चौकशी न करता पोलिसांनी हा गुन्हा राजकीय दबावामुळे दाखल केला असल्याचे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षातील नेत्यांना लक्ष्य करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असा आरोप करण्यात येत आहे. यानंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार बागडे यांना शुक्रवारपासून सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. मात्र बगाडे यांची बदली करावी अशी मागणी सध्या भाजपच्या वतीने लावून धरली आहे.

2021 मध्ये तत्कालिन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही बगाडे यांच्याविरोधात आवाज उठवला होता. बगाडे यांची वागणूक अत्यंत उध्दटपणाची होती. कुणाही लोकप्रतिनीधीची कॉलर पकडून ते त्यांचा अपमान करतात. आर्थिक गुन्हे शाखेला बदली झाल्यावरही बिल्डरांकडून कार्यालयात बोलवून घेत, हप्ते घेतल्याचा गंभीर आरोप आव्हाड यांनी केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube