BMC जिंकण्यासाठी भाजपची आयडिया; सर्व माजी नगरसेवकांना दोन शिफ्टमध्ये लावलं कामाला

BMC जिंकण्यासाठी भाजपची आयडिया; सर्व माजी नगरसेवकांना दोन शिफ्टमध्ये लावलं कामाला

मुंबई : मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांना मुंबई महापालिका मुख्यालयात देण्यात आलेल्या कार्यालयाला ‘सिटिझन सेंटर’ असं नाव देण्यात आलं आहे. सोबतच आता हे कार्यालय सार्वजनिक तक्रारी ऐकण्यासाठी भाजपच्या माजी नगरसेवकांना वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. इतकंच नाही तर या कार्यालयाचा वापर करण्यासाठी त्यांना दोन शिफ्टमध्ये वेळ देण्यात आली आहे. आठवड्यातील सर्व कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 2 आणि दुपारी 2 ते 6 अशा दोन शिफ्टमध्ये भाजपच्या माजी नगरसेवकांना या कार्यालयाचा वापर करता येणार आहे. (Mumbai Suburban Guardian Minister Mangal Prabhat Lodha’s office has been allowed to be used by former BJP corporators to hear public grievances)

याबद्दल बोलताना एक ज्येष्ठ माजी नगरसेवक म्हणाले, “पालकमंत्र्यांकडे इतर महत्त्वाची खाती आहेत त्यामुळे ते दररोज इथे उपस्थित राहू शकत नाहीत. म्हणून त्यांच्या वतीने इथे उपस्थित राहून सर्वसामान्यांशी संवाद साधणार आहोत. हे कार्यालय स्थापन करण्याचा मूळ विचार लोकांशी जवळीक साधणे हा आहे. कारण आमच्या सरकारचा लोकांशी संवाद केवळ सोशल मीडियापर्यंत मर्यादित नाही. तळागाळातील स्थानिकांपर्यंत पोहोचण्यासाठी आमचे सरकार ओळखले जाते. पण आता आमचा कार्यकाळ संपला आहे, आम्ही फक्त पक्षाचे कार्यकर्ते आहोत, कोणतेही अधिकृत पद नाही. आम्ही पालकमंत्र्यांच्या वतीने जनतेच्या तक्रारी लक्षात घेत आहोत, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केलं.

कार्यालयावर आदित्य ठाकरेंची टीका :

दरम्यान, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांना मुंबई महापालिकेत देण्यात आलेल्या कार्यालयावरुन शिवसेना (UBT) चांगलाच आक्रमक झाला आहे. याचे पडसाद आज विधानसभेतही पाहायला मिळाले. अनेक भाजपच्याच नगरसेवकांचं हे कार्यालय झालं असल्याचं म्हणत आमदार आदित्य ठाकरे यांनी या निर्णयावर सडकून टीका केली.  ठाकरे म्हणाले, आता पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं हे कार्यालय आहे असं मला वाटत नाही, कारण अनेक भाजपच्याच नगरसेवकांचं हे कार्यालय झालं आहे. त्यांना आता BMC चं नाव कॅसा BMC असं ठेवायचं असेल. मी देखील मुंबईचा पालकमंत्री होतो पण आम्ही महापौर आणि आयुक्तांच्या दालनामध्ये बैठका घेतं होतो. कुठेही महापालिकेत पालकमंत्र्यांंचं कार्यालय नाही पण मुंबई महापालिकेत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचं कार्यालय आहे, असंही ते म्हणाले आहेत.

आयुक्तांचं स्पष्टीकरण :

या वादावर बोलताना मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल म्हणाले की, कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव खुद्द पालकमंत्र्यांकडून आला होता. राज्य सरकारने ‘शासन तुमच्या दारी’ अभियान सुरू केले असून, त्याअंतर्गत मंत्री त्यांच्या मतदारसंघात जाऊन लोकांशी संवाद साधत आहेत. मंत्रालयाप्रमाणेच, BMC सर्वांसाठी असल्याने मला पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडून महानगरपालिकेत कार्यालय मिळावे, असा अर्ज प्राप्त झाला होता. या विनंतीच्या आधारे, पालकमंत्र्यांना कार्यालय देण्यात आले आहे. हे कार्यालय कोणत्याही विशिष्ट व्यक्ती किंवा राजकीय नेत्याला दिलेले नाही, असेही चहल यांनी स्पष्ट केलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube