एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर कसा कब्जा मिळवला? वाचा आयोगाचा तर्क
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बाळासाहेबांची शिवसेना हीच मूळची शिवसेना असल्याचे कसे काय सिद्ध झाले किंवा शिंदे यांच्या गटालाच धनुष्यबाण हे चिन्ह का मिळाले, याचे उत्तर निवडणूक आयोगाने आज दिलेल्या निकालात सविस्तरपणे दिले आहे. उद्धव ठाकरे यांच्या गटापेक्षा शिंदे यांची कोणती बाजू वरचढ ठरली? तर त्याचे उत्तर आहे आमदार आणि खासदार यांच्या संख्येतच. आमदार किंवा खासदार फुटले तरी मूळ पक्ष फुटत नाही, असा दावा शिवसेनेचे नेते करत होते. पण प्रत्यक्षात आमदार आणि खासदार यांचीच संख्या या फुटिमध्ये महत्वाची ठरली. या दोन्ही पदांची संख्या शिंदे गटाकडे असल्याचे स्पष्टपणे दिसून आल्यानेच आयोगाने त्यांच्याकडे मूळ पक्ष आणि चिन्हे देण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही गटांचे विविध फ्रंटियरचे पदाधिकारी किंवा कार्यकर्ते यांनी दिलेली प्रतिज्ञापत्रांतून पुरेसे बहुमत स्पष्ट होत नव्हते. तसेच प्रतिनिधी सभेतही कोणाकडे बहुमत याचा उलगडा होत नव्हता, अशी स्पष्ट नोंद आयोगाने केली आहे.
भाजपने शिवसेनेला पाॅलिटिकली चिरडले….शिवसेना आणि धनुष्यबाण दोन्ही एकनाथ शिंदे गटाचे : भाजपने ठाकरेंना पॉलिटिकली चिरडले
शिवसेनेच्या फुटिनंतर एखनाथ शिंदे यांच्याकडे १३ तर ठाकरे यांच्याकडे पाच खासदार होते. ठाकरे गटाने सहा खासदारांचा पाठिंबा असल्याचे नमूद केले होते. प्रत्यक्षात चार खासदारांनीच ठाकरेंना पाठिंबा देणारे प्रतिज्ञापत्र सादर केले. शिवसेनेला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकूण एक कोटी दोन लाख ४५ हजार १४३ मते मिळाली. खासदारांच्या पाठिंब्यानुसार शिंदे गटाकडे ७४ लाख ८८ हडार ६३४ मतांचा पाठिंबा असल्याचा निष्कर्ष असल्याचा आयोगाने काढला. त्या तुलनेत ठाकरे गटाकडे २७ लाख ५६ हजार ५०९ एवढीचे मते राहिली. आमदारांच्या संख्येबाबतही असेच निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ५५ आमदार विजयी होऊन शिवसेनेला एकूण ४७ लाख ८२ हजार ४४० मते मिळाली. त्यातील ४० आमदार हे शिंदेकडे गेल्याने त्यांच्याकडे ३६ लाख ५७ हजार ३२७ मते राहिली. या तुलनेत ठाकरे गटाकडे १५ आमदारांची ११ लाख २५ हजार ११३ मते राहिली. विधीमंडळ पक्षातील फुटीवरून मूळ संघटनेतील फूट स्पष्टपणे लक्षात येत नसली तरी त्यावरून कल लक्षात येत असल्याचे आयोगाने म्हटले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) आणि नाव मशाल हे चिन्ह ठाकरे गटाकडे आधीच्या हंगामी आदेशानुसार देण्यात आले होते. ते त्यांच्याकडेच राहील, असे आयोगाने आदेशात म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय अनपेक्षित होता, असे म्हणत देशातील लोकशाही धोक्यात आल्याची प्रतिक्रिया दिली आहे. दुसरीकडे देशात बेबंदशाही सुरू झाल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला. मात्र शिंदे यांनी आमदार आणि खासदार आपल्याकडे वळवून पक्षावर ताबा मिळवला आहे. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना निवडणूक आयोगाने हा निर्णय दिल्याबद्दल ठाकरे यांनी कडाडून टीका करत निवडणूक आयोगाने शेण खाल्ले असा घणाघाती आरोप केला.