राहुल गांधी प्रकरणाचे विधानसभेत पडसाद: महाविकास आघाडीचा बहिष्कार
मुंबई : विधान सभेच्या परिसरात भाजप आणि शिवसेनेच्या आमदारांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केलं होतं. त्या आमदारांविरोधात कारवाई करावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केली होती. यावर मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्र्यांकडून कोणताही साकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीने विधानसभेतील कामकाजावर बहिष्कार टाकला आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली.
अजित पवार म्हणाले, महाविकास आघाडीने विधाससभेतील संपूर्ण कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. आज सकाळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी काही मद्दे उपस्थित केले होते. त्यामध्ये दोन दिवसांपूर्वी विधानसभेच्या आवारात जे कृत्य घडले होते ते कोणत्याही राष्ट्रीय नेत्यांच्या विरोधात होऊ नयेत. अशी आमची मागणी होती. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, विधानसभा अध्यक्षांशी चर्चा केली पण कोणताही मार्ग निघाला नाही. त्यामुळे विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.
ओबीसींच्या नावाने भाजपाची देशात व राज्यात नौटंकी सुरु, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले, आजपर्यंत कोणत्याही राष्ट्रीय नेत्यांची अवहेलना करणारे कृत्य विधानभवनाच्या प्रांगणात घडले नव्हते. पुन्हा कधी विधानभवनाच्या प्रांगणात असे कृत्य घडू नये यासाठी योग्य संदेश देणं गरजेच आहे. ज्या आमदारांनी हे कृत्य केले आहे. त्यांना निलंबीत करावं अशी आम्ही मागणी केली होती. आमच्या काही सदस्यांनी काही चुकीच्या घोषणा विधानसभेत दिल्या असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करा. विधानभवनाच्या प्रांगणात अशाप्रकारचे कृत्य चालणार नाही हा संदेश जाईल. पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती आणि विधानसभा अध्यक्ष यांच्याकडून कोणताही शिस्तीचा संदेश दिला गेला नाही म्हणून आम्ही कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. असे त्यांनी सांगितले.