Mental problems : देशात आता मानसिक आरोग्य तपासणी: कोविडने वाढली समस्या?

Mental problems : देशात आता मानसिक आरोग्य तपासणी: कोविडने वाढली समस्या?

मुंबई : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने देशातील विविध महानगरांमध्ये मानसिक आरोग्य सर्वेक्षण (Mental Health Survey) प्रातिनिधिक स्वरुपात हाती घेण्यात आले आहे.यासाठी मुंबईतील (Mumbai) टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बाई य.ल.नायर धर्मादाय रुग्णालयाची निवड करण्यात आली आहे.

या सर्वेक्षणामध्ये विशेष सॉफ्टवेअरने आपोआप निवडलेल्या ३ हजार ६०० व्यक्तींची सुमारे ३० ते ४० मिनिटे मुलाखत घेण्यात येईल.

त्यादृष्टीने मुंबईत वस्ती पातळीवर पोहोचून सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मानसिक आजारांचे प्रमाण ठरवून त्याआधारे मानसोपचार यंत्रणा उभारणी व तिचे बळकटीकरण करण्याची गरज निश्चित करणे, यासाठी हे सर्वेक्षण अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.

२०१५-१६ साली देशातील पहिले राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण करण्यात आले होते. यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि मज्जासंस्था विज्ञान (NIMHANS – National Institute of Mental Health & Neurosciences) या संस्थेची मध्यवर्ती समन्वय केंद्र म्हणून निवड करण्यात आली होती.

या सर्वेक्षणात देशातील १२ राज्यांचा समावेश होता. या सर्वेक्षणानुसार, मनोविकारांचे आजीवन प्रमाण हे शहरी भागात १४ टक्के तर ग्रामीण भागात १० टक्के इतके आढळले. ज्यात चिंता (नर्व्हस्), नैराश्य (मूड डिसऑर्डर), अति मद्य सेवन यांचा समावेश होता.

यातील बहुतेक आजारांसाठी उपचारांची गरज व प्रत्यक्षउपलब्धता यातील तफावत ६० टक्क्यांहून अधिक आढळली होती. औषधे, मानसोपचारतज्ञ, मानसशात्रज्ञ व मानसोपचार परिचारिका यांची मोठी कमतरता सर्वच राज्यांमध्ये आढळून आली होती.

यामध्ये वस्ती पातळीवर सर्वेक्षण करण्यासाठी १ मुख्य समन्वयक आणि ७ क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे कर्मचारी घरोघरी जाऊन विशेष सॉफ्टवेअरच्या मदतीने निवडलेल्या निवडक कुटुंबातील व्यक्तींच्या मुलाखती घेतील.

मुलाखतीसाठी संमती दिल्यानंतर त्या व्यक्तींच्या मुलाखती घेण्यात येतील. सर्वेक्षणासाठी मंत्रालयाने ठरवून दिल्यानुसार सुमारे ३ हजार ६०० व्यक्तिंची मुलाखत यामध्ये घेतली जाईल. एका व्यक्तीच्या मुलाखतीस सुमारे ३० ते ४० मिनिटांचा अवधी लागेल.

समाजातील सर्व स्तरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात येणार असून कोविडमुळे झालेल्या मानसिक परिणामांसंबंधी प्रश्नही यात समाविष्ट केले आहेत. ऑगस्ट/सप्टेंबर २०२३ पर्यंत म्हणजे येत्या ८ ते ९ महिन्यांच्या कालावधीत हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येईल.

हे सर्वेक्षण करण्याच्या दृष्टीने मुलाखतीसाठी आपल्या घरी कर्मचारी आल्यास त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube