गणेशोत्सवादरम्यान मेट्रो 2ए आणि 7 या मार्गिकांवरील गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

गणेशोत्सवादरम्यान मेट्रो 2ए आणि 7 या मार्गिकांवरील गाड्या मध्यरात्रीपर्यंत धावणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

Ganeshotsav 2025 : सणासुदीच्या कालावधीत प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी एमएमआरडीएने मोठा निर्णय घेतला आहे. अंधेरी पश्चिम (२ए मार्गिका) आणि गुंदवली (७ मार्गिका) या दोन्ही टर्मिनल स्थानकांवरून शेवटच्या गाड्या आता रात्री ११:०० वाजण्याऐवजी मध्यरात्री १२:०० वाजेपर्यंत धावणार आहेत. ही विशेष सेवा २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या ११ दिवसांपर्यंत प्रवाशांसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती मेट्रो प्रशासनाने दिली आहे.

मुंबईत साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav 2025) भाविकांना पुरेपूर आनंद घेता यावा यासाठी मेट्रोने विशेष सेवा देऊ केली आहे. गणेशोत्सवादरम्यान मुंबईच्या विविध भागांमध्ये असलेल्या गणेश मंडळांना लाखो भाविक भेट देत असतात. हे लक्षात घेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे (एमएमआरडीए) २ए व ७ या मार्गिकांवर विस्तारित सेवा सुरू करण्यात येणार आहेत, जेणेकरून प्रवाशांना या सणासुदीच्या काळात सुरक्षित, सुरळीत आणि विश्वासार्हतेने रात्री उशीरापर्यंत प्रवास करता येऊ शकेल.

ट्रेनच्या कामकाजाच्या वेळा
आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी (सोमवार–शुक्रवार)
एकूण ३१७ फेऱ्या (या आधीच्या ३०५ फेऱ्यांमध्ये १२ फेऱ्यांची वाढ)
गर्दीच्या वेळेत : दर ५ मिनिटे ५० सेकंदांनी एक गाडी
गर्दी नसलेल्या वेळेत : दर ९ मिनिटे ३० सेकंदांनी एक गाडी

शनिवारी
एकूण २५६ फेऱ्या (या आधीच्या २४४ फेऱ्यांमध्ये १२ फेऱ्यांची वाढ)
गर्दीच्या वेळेत : दर ८ मिनिटे ६ सेकंदांनी एक गाडी
गर्दी नसलेल्या वेळेत : दर १० मिनिटे २५ सेकंदांनी एक गाडी

रविवारी
एकूण २२९ फेऱ्या (या आधीच्या २१७ फेऱ्यांमध्ये १२ फेऱ्यांची वाढ)
दर १० मिनिटांनी एक गाडी
प्रवाशांच्या मागणीनुसार आवश्यक असल्यास अतिरिक्त फेऱ्या चालवण्यात येतील.

गणेशोत्सवादरम्यान सुलभ प्रवासासाठी
गणेशोत्सवादरम्यान मुंबईतील गणेश मंडळांना भेट देणाऱ्या आणि गणपतीचे दर्शन घेण्याच्या निमित्ताने प्रवास करणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरळीतपणे व्हावा यासाठी या वाढीव फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. विश्वासार्ह आणि कार्यक्षम मेट्रो सेवेच्या माध्यमातून प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ करत शहराच्या सांस्कृतिक परंपरा जतन करण्यासाठी एमएमआरडीए कायम वचनबद्ध आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा आत्मा आहे. गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत लाखो भक्त विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी मुंबईत प्रवास करतात. त्यांना मध्यरात्रीपर्यंत सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवाससुविधा मिळणे ही आमची जबाबदारी आहे. कोणत्याही प्रकारच्या वातावरणात प्रवास करण्यासाठी मेट्रो ही भक्तांसाठी अधिक विश्वासार्ह परिवहन सेवा आहे. म्हणूनच २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर, या कालावधीत मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांवरील गाड्या मध्यरात्रीपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या उपक्रमामुळे गणेशभक्तांना शहरभरातील मंडळांमध्ये अधिक सोयीस्करपणे जाता येईल, त्याचप्रमाणे मुंबई वन साठी जागतिक दर्जाची वाहतूक यंत्रणा उभारण्याची आमची बांधिलकी या उपक्रमातून दिसून येते, जी सुरक्षित, कार्यक्षम आणि लोकाभिमुख असेल.”

उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे म्हणाले की, “गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा अभिमान आहे आणि प्रत्येक मुंबईकराच्या मनात गणेशोत्सवाचे विशेष स्थान आहे. या काळात लाखो भक्त शहरभर फिरून उत्सवात सहभागी होतात आणि त्यांचा प्रवास सुरक्षित, सुरळीत आणि आरामदायी होणे ही सरकार म्हणून आमची जबाबदारी आहे. मेट्रो सेवा मध्यरात्रीपर्यंत वाढवून आणि संचालन अधिक सक्षम करून नागरिकांना प्रवासाची चिंता न करता उत्सवाचा आनंद घेता येईल, याची एमएमआरडीएने खातरजमा केली आहे. सांस्कृतिक परंपरा जपत मुंबईकरांना आधुनिक, जागतिक दर्जाच्या वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी (भा. प्र. से.) म्हणाले की, “गणेशोत्सव हा मुंबईत सर्वात मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येणारा उत्सव आहे. लाखो भक्त विघ्नहर्त्याच्या दर्शनासाठी उशिरापर्यंत प्रवास करतात. त्यांच्या सोयीसाठी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या कालावधीत मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांवरील फेऱ्या नेहमीप्रमाणे रात्री ११ वाजेपर्यंत न धावता मध्यरात्री १२ वाजेपर्यंत धावतील. या काळात आठवड्यातील कामकाजाच्या दिवशी गर्दीच्या वेळेत गाड्यांची वारंवारता अधिक असेल, तर रविवारी दर १० मिनिटांनी गाडी उपलब्ध असेल. यामुळे प्रवास सर्वांसाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि सोयीस्कर होईल. ‘मुंबई इन मिनिट्स’ या आमच्या व्हिजनशी सुसंगत असलेल्या या उपक्रमामुळे देशांतर्गत तसेच परदेशी पर्यटकांनाही त्यांच्या आवडत्या गणेश मंडळांपर्यंत काही मिनिटांत पोहोचण्याची सुविधा उपलब्ध होईल. त्यामुळे या उत्सवादरम्यानचा त्यांचा प्रवास अधिक सुकर आणि आनंददायी होईल.”

जय शाह तुमचा कोण, क्रिकेट आणि रक्त एकत्र वाहणार का? ; भाजपवर उद्धव ठाकरेंचा घणाघात 

एमएमएमओसीएलच्या व्यवस्थापकीय संचालिका, रुबल अगरवाल (भा. प्र. से.) म्हणाल्या की, “गणेशोत्सवाच्या काळात लाखो लोक बाहेर पडतात आणि त्यांचा प्रवास सुरळीत व तणावरहित व्हावा, हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. म्हणूनच मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांवरील शेवटच्या फेऱ्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आल्या असून, आठवड्याच्या कामकाजाच्या दिवशी गर्दीच्या वेळेत गाड्यांची वारंवारता वाढवली आहे, तर रविवारी दर १० मिनिटांनी गाडी उपलब्ध असेल. यामुळे उत्सवाच्या गर्दीचे व्यवस्थापन अधिक चांगल्या प्रकारे होईल आणि नागरिकांना वाहतूककोंडीत न अडकता त्यांच्या आवडत्या मंडळांच्या गणपतींचे दर्शन घेण्यासाठी सुरक्षित, विश्वासार्ह आणि सोयीस्कर प्रवासाचा पर्याय मिळेल.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube