Video : मराठी माणसाला घर नाकारलं; महिलेने रडूनच हकीकत सांगितली…
एका मराठी दाम्पत्याला मुंबईतील मुलुंड भागात असलेल्या शिवसदन इमारतीच्या सचिवांनी घर नाकारल्याचं समोर आलं आहे. या सोसायटीमध्ये मराठी माणसं अलाऊड नसल्याचं सांगण्यात आल्याचा दावा महिलेने केला आहे. यासंदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्या सारखा पसरत असून व्हिडिओच्या माध्यमातून सदरील महिलेने महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांवरही ताशेरे ओढल्याचं दिसून आलं आहे.
तृप्ती देऊळगावर नामक महिला मुलुंड भागात घर पाहण्यासाठी गेले असता तिथल्या सोसायटी सचिवांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी मराठी माणसाला घर नाकारल्याने संतप्त महिलेने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओमध्ये महिला म्हणतेयं, मला अतिशय वाईट अनुभव आला आहे. मराठी माणसाला मुंबईत ज्या पद्धतीची वागणूक मिळत आहे. ती अतिशय वाईटच आहे. हे आत्ताच थांबलं नाही तर पुढे मराठी माणूस नावालाही मुंबईत शिल्लक राहणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी घ्यायची आपली लायकी राहिलेली आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.
मराठी लोकांचे कैवारी म्हणतात ना, त्या सगळ्यांनी आपल्या पाट्या काढून टाका. मराठी माणसांची मुंबईत काय किंमत आहे ती मला आज कळली आणि जाणवली देखील आहे. मुलुंडमध्ये आम्ही ऑफिससाठी जागा पाहण्यासाठी गेलो तर त्या ठिकाणी मराठी माणूस आणि महाराष्ट्रीय लोकांना जागा देण्यास नकार देण्यात आला. तर सदर सोसायटीच्या व्यक्तीला त्यावर प्रश्नचिन्ह केला तर त्याने आमच्यावर मुजोरी केली. दादागिरी केली. ज्याला आणायचे त्याला आण, अशी धमकी देत वाईट वागणूक दिली असल्याचा दावा या महिलेने केला.
Sanjay Raut : बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार? राऊतांनी सांगितलं कोण जिंकणार
नवऱ्याला मारहाण केल्याचा आरोप :
घर पाहण्यासाठी गेलो तेव्हा आम्हाला घर नाकारताच आम्ही लिहुन देण्याबाबत सांगितलं तर माझ्या नवऱ्याला व मला देखील मारहाण केली. हा सर्व प्रकार रस्त्यावर घडत होता. परंतू तरी देखील आम्हाला एकाही मराठी माणसानं वाचवले नाही की आमच्या मदतीसाठी देखील धाव घेतली नाही. शिवरायांचं नाव घेऊन मावळा म्हणण्याचा अधिकार कोणालाच आहे काय? मराठीचा कैवारी म्हणणाऱ्या आणि मावळा म्हणणाऱ्यांनी त्यांचे मावळेपण खड्ड्यात घातले पाहिजे, अशी संतप्त भावना महिलेने केली.
दरम्यान, सगळेच गुजराती लोकं वाईट नाहीत, पण अनेकांना याचा अनुभव आला व येत असेल. या लोकांची परराज्यातून आलेल्या लोकांची मुजोरी एवढी वाढली कशी, असा सवाल देखील उपस्थित करत संताप व्यक्त केला आहे.
संबंधितांकडून माफीनामा
संतप्त महिलेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जाब विचारण्यासाठी काही मराठी तरुणांनी सदरील इमारतीच्या सचिवाकडे गेले असता सचिवांनी “आमच्याकडून चुकी झाली पुन्हा होणार नाही, संबंध मराठी माणसांची मी माफी मागतो” या शब्दांत माफी मागितली आहे.